कलेढोण – पडळ (ता. खटाव) येथील कारखाना परिसरात भर रस्त्यात महिंद्रा बोलेरो गाडीतून एनकुळ (ता.खटाव) येथील एक युवक देशी-विदेशी दारू आणि गुटख्याची सर्रास विक्री करत आहे.
या परिसरात रात्री दारू, गुटखा खरेदीसाठी तळीरामांची गर्दी होत आहे. याचा त्रास वाहनचालकांना होत आहे. ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टरचालकांचे दारू पिण्याचे प्रमाण वाढल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. काही नागरिकांनी या युवकाला हटकलेदेखील होते. मात्र, त्या युवकाने नागरिकांशी हुज्जत घातली. दरमहा हप्ता देतोय. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, असा दम दिला. दारू विक्रेत्याची ही मजल पाहता, त्याला नेमका कोणाचा वरदहस्त आहे, याची चर्चा आहे.
पडळ हे गाव वडूज आणि सातार्याकडे जाणार्या मुख्य मार्गावर असल्याने, या रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे. साखर कारखान्यामुळे उसाची वाहतूकदेखील मोठ्या प्रमाणात सुरू असते. या रस्त्यावरून अनेक नागरिक सातारा व वडूज येथे शासकीय कामांसाठी जातात. अशा वेळी भर रस्त्यात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या दारू, गुटखा विक्रीवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
तंबाखूजन्य पदार्थांची राजरोस विक्री
पडळसह परिसरातील अनेक गावांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री राजरोस सुरू आहे. काही ठिकाणी शालेय परिसरातदेखील अशी विक्री सुरू आहे. मात्र, यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कठोर कारवाई होताना दिसत नाही.