रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाची मुंबई येथे बैठक
सातारा – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट ) प्रदेशाध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आंबेडकर गट) बैठकीत महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील जागा लढवण्याचा निर्धार सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.
या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. मोहनलाल पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, कैलास जोगदंड, रमेश भोईर, अशोक ससाने, अरुण भिंगारदिवे, आप्पासाहेब गायकवाड, संतोष इंगोले, राजेंद्र नित्यनवरे, आर. एम. वानखेडे, दुर्वास चौधरी, सचिन खरात, सचिन कोकणे, शशिकांत दरोडे, सुरेश दाभाडे, आलम शेख, अंकुश चव्हाण, गणेश चंद्रशेखर यांच्यासह महाराष्ट्रातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते दिपक भाऊ निकाळजे यांनी दक्षिण मध्य मुंबई व अमरावती या राखीव मतदार संघातून निवडणूक लढवल्यास त्यांना विक्रमी मताने निवडून आणण्यासाठी सर्व समाज बांधव परिश्रम घेतील. असा विश्वास व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघासाठी पक्षाच्या वतीने प्रभारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या भूमिकेबाबत तसेच पक्ष वाढीसाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल अभिनंदन ठराव करण्यात आला.
सध्या राजकीय पटेलावर राजकीय प्रमुख पक्ष्यापेक्षाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मानणाऱ्या मतदारांची संख्या पाहता स्वबळावर निवडणूक लढवून सर्व जागी उमेदवार केल्यास प्रस्थापितांना पराभव पहावा लागेल . अशा शब्दात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आमची भूमिका आमचा विचार व आमचे स्वातंत्र्य जो मान्य करेल. त्या पक्षासोबतच भविष्यात वेळ आली तरच त्यांना सोबत घेतले जाईल. अन्यथा स्वयं ताकतीवर निवडणुका लढवण्यास आपण सज्ज आहोत. असे स्पष्ट करण्यात आले.
सातारा लोकसभेसाठी नवीन चेहऱ्याला प्राधान्य
पूर्वी सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये अनेक त्रुटी होत्या. एक चांगला उमेदवार असूनही मतदारांपर्यंत त्याची भूमिका पोहोचवण्यास अपयश आले होते. ते अपयश धुवून काढण्यासाठी सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये नवीन चेहऱ्याला प्राधान्य दिले जाईल. असे स्पष्ट करण्यात आले. या बैठकीच्या माध्यमातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट पुन्हा एकदा नव्या जोमाने नव्या उमेदीने सक्रिय झालेला आहे. सध्या देश पातळीवर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असले तरी वैचारिक भूमिका घेऊनच या निवडणुकीत सामोरे जाण्यासाठी पक्षाचे नेते निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली दमदार वाटचाल सुरू आहे.