पिंपरी – पाण्याची थंड बाटली घेऊन न आल्याने गुंडांकडून एका तरूणाला कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 15) रात्री साडेअकराच्या सुमारास पिंपरीतील बौद्धनगर येथे घडली.
अशोक चिंतामण डोंगरे (वय 30, रा. बौद्धनगर, पिंपरी) असे जखमी तरूणाचे नाव असून त्याने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी सुरज किरवले (वय ३०), अविनाश माने (वय २६), गणेश जमदाळे (वय २०, सर्व रा. भाटनगर, पिंपरी) व पाशा (पुर्ण नाव माहित नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचे घरी जात असताना आरोपी सुरज याने फिर्यादीस हाक मारून बोलावून, ‘‘ एक पाण्याची थंड बॉटल घेऊन ये ’’ असे म्हटल्यावर फिर्यादीने त्यास नकार दिला. त्यामुळे चारही आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली.
आरोपी पाशा याने फिर्यादीस ‘‘ सुरज भाईला नाय म्हणतो, तुझा विषय संपला आता ’’, असे म्हणून फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने वार केले. फिर्यादी रक्तबांबाळ झाल्यानंतर आरोपी गुंडांनी तेथून पळ काढला.