पुसेगाव – पुसेगाव येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या ७६ व्या पुण्यस्मरणानिमित्त चार दिवसीय श्री सेवागिरी चषक डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला उत्साहाच्या वातावरणात सुरुवात झाली.
या वेळी देवस्थानचे मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मैदानाचे पूजन करण्यात आले. यावेळी सुंदरगिरी महाराजांनी मैदानात उतरून जोरदार बॅटिंग केली. उद्घाटन सोहळ्याला ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, ट्रस्टचे माजी पदाधिकारी, पंचक्रोशीतील नामांकित खेळाडू, क्रिकेटप्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर सुंदरगिरी महाराजांना क्रिकेट खेळण्याचा आग्रह केला असता सुरेश जाधवांच्या बॅलिंगवर त्यांनी बॅटिंग केली. स्पर्धेत मर्यादित ३२ संघ सहभागी झाले असून दोन गावनिहाय, एक तालुकानिहाय व एक ओपन हाफ प्रमाणे सामने खेळवले जात आहेत.
प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्या संघांना अनुक्रमे १ लाख ५१ हजार रुपये, १ लाख १ हजार रुपये, ५१ हजार रुपये, २५ हजार रुपये व चषक बक्षीस देण्यात येईल. अनेक राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत कारकीर्द गाजविलेल्या नामांकित खेळाडूंचा या स्पर्धेमध्ये सहभाग आहे, तरी सर्व क्रिकेटप्रेमींनी उपस्थित राहून या क्रिकेट सामन्यांचा आनंद घ्यावा, असे आवाहन ट्रस्टमार्फत करण्यात आले आहे.