पिरंगुट – नांदे-म्हाळुंगे रस्त्यासाठी लवकरच पावले उचलली जाणार आहेत. गुरुवारी संतप्त नांदे ग्रामस्थांनी या रस्त्याच्या बिकट अवस्थेला कंटाळून रास्ता रोको आंदोलन केले होते. याची दखल घेत आमदार संग्राम थोपटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे येथे बैठक घेत यातून तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. येत्या 10 दिवसांत काम चालू होणार असल्याचे आश्वासन संबंधित अधिकार्यांनी दिले आहे.
या बैठकीस आमदार संग्राम थोपटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, मुळशीचे अधिकारी मधुकर भिंगारदिवे, मुळशी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, बाजार समितीचे संचालक दादाराम मांडेकर, माजी आदर्श सरपंच प्रशांत रानवडे, अविनाश करंजावणे, सचिन करंजावणे आदी उपस्थित होते.
नांदे-म्हाळुंगे रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून बिकट अवस्थेत आहे. निधी मंजूर होऊन पण रस्ता होत नव्हता. ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता करण्यास असमर्थ ठरत होते. तांत्रिक अडचणी व रस्ता करताना होणारी अडवणूक त्यास कारणीभूत ठरत होती. मात्र त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे समस्त नांदे ग्रामस्थं यांच्यावतीने पुढाकार घेत माजी सरपंच प्रशांत रानवडे यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
त्यास मुळशीतील सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा देत आंदोलनास उपस्थिती दर्शवली. त्यामुळे त्याची दखल घेत तत्काळ आमदार संग्राम थोपटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामस्थं यांची बैठक घेतली. त्यात येत्या 10 दिवसात रस्त्याचे काम सुरू होत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सध्यातरी नांदे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. हा रस्ता झाल्यास विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक, ग्रामस्थं यांना त्याचा अतिशय उपयोग होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील अवजड वाहतूक लक्षात घेऊन दमदार रस्ता करावा अशी अपेक्षा ग्रामस्थं व्यक्त करीत आहेत.
तर गुन्हा दाखल करा – थोपटे
या रस्त्याच्या कामाच्या बाबतीत कोण अडवणूक करत असेल किंवा करेल तर त्यांच्यावर लागलीच गुन्हा दाखल करावा, असे आमदार संग्राम थोपटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश दिले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कामात अडवणूक करणारांनी आता रस्ता होऊ देणे योग्य ठरेल. अन्यथा पुढील कारवाईला त्यांना सामोरे जावे लागेल.