सातारा – आजच्या या काळात विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनामध्ये संधी शोधून प्रत्येक गोष्ट मी तयार करणार, असा मानस मनाशी करावा, असे प्रतिपादन आ. महेश शिंदे यांनी केले.
देऊर (ता. कोरेगाव) येथील श्री. मुधाईदेवी विद्यामंदिर याठिकाणी भरलेल्या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आ.शिंदे बोलत होते. ते म्हणाले, निसर्गासंबधी शोधातून निसर्ग जपणे व त्याचे वैज्ञानिक संशोधन होणे गरजेचे आहे. त्याचाही अभ्यास करून आपण समृद्ध व्हावे. चंद्र, सूर्य, ग्रह, तारे याचा शोध कुणी लावला हा प्रश्न आहे. परंतु आपल्या प्राचीन काळापासून ग्रंथात या सर्वांचा उल्लेख आढळतो.
तक्षशिला व नालंदा विद्यापीठे जगात सर्वश्रेष्ठ होती. संशोधक व्हायचे असेल तर पूर्वीचे ग्रंथ अवश्य वाचलेच पाहिजेत. संस्कृतीचं ज्ञान आपल्याकडे आले नाही याचे कारण म्हणजे आम्ही वाचत नाही. पूर्वजांच्या ठेव्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. अध्यात्म आणि विज्ञान याचा खूप मोठा संगम आहे.
या कार्यक्रमास पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर माने, कोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सखाराम बिराजदार, श्री. मुधाईदेवी शिक्षण संस्थेचे चेअरमन हणमंतराव कदम, संस्थेचे विश्वस्त सर्जेराव कदम, धनसिंग कदम, किरण फाळके, गणेश लोखंडे, विस्तार अधिकारी, अरूण घोरपडे, केंद्रप्रमुख, शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी, विज्ञानप्रेमी उपस्थित होते.
प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी केले. सुत्रसंचालन प्रसाद गायकवाड यांनी केले. आभार प्राचार्य उत्तम महामुलकर यांनी मानले.