कोविडसाठी हस्तांतरणास असहकार्य केल्याने प्रशासनाची कारवाई
फलटण (प्रतिनिधी) – कोविड-19 रुग्णांवरील उपचारांसाठी अधिगृहीत करण्यात आलेले रुग्णालय प्रशासनाच्या ताब्यात देण्यास टाळाटाळ केल्याने फलटण येथील डॉ. जे. टी. पोळ यांचे निकोप हॉस्पिटल सोमवारी (दि. 24) रात्री उशिरा सील करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी ही कारवाई केली. कोविडसंदर्भात अशी कारवाई करण्यात आलेले हे जिल्ह्यातील पहिले रुग्णालय आहे.
फलटण येथील डॉ. जे. टी. पोळ यांचे निकोप हॉस्पिटल कोविड-19 च्या रुग्णांवरील उपचारांसाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने अधिग्रही केले होते; परंतु ऑक्सिजनची गरज असलेल्या कोविडच्या रुग्णांना निकोप हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी तेथील डॉक्टर्स व कर्मचारी सहकार्य करत नसल्याने हे पाऊल उचलावे लागले आहे.
आता निकोप हॉस्पिटलमधील आयसीयू कोव्हिड रुग्णांसाठी अधिग्रहीत केला आहे. ऑक्सिजनची गरज असलेल्या कोविड रुग्णांना तिथे लवकरच हलवण्यात येणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.