मल्हारपेठ (प्रतिनिधी) –कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून पत्नीचा खून केल्याची घटना दिवशी बुद्रुक (ता. पाटण) येथे घडली. उत्तम सखाराम महापुरे असे संशयित पतीचे नाव असून सावित्रा उत्तम महापुरे (वय 51) असे पत्नीचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, उत्तम महापुरे यांची पत्नी, मुले, सुना पुणे येथे राहतात. तर उत्तम महापुरे दिवशी बुद्रुक येथे एकटा राहतो. महापुरे कुटुंबांची दिवशी बुद्रुक येथील लक्ष्मीनगर येथे एक वस्ती आहे. करोनामुळे तीन महिन्यांपूर्वी सर्व जण गावाकडे आले व लक्ष्मीनगर येथील घरात वास्तव्यास होते. दि. 25 रोजी पहाटे सहाच्या सुमारास संशयित उत्तम महापुरे याने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातले.
अचानक झालेल्या हल्ल्याने सर्वजण खडबडून जागे झाले. मात्र, घाव वर्मी बसल्याने सावित्री महापुरे निपचित पडल्या. हल्ल्यानंतर झालेल्या आरडाओरड्याने शेजारचे लोक धावून आले. युवकांनी तातडीने जखमी सावित्रा यांना कराड येथे उपचारासाठी कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे बेड उपलब्ध नसल्याने त्यांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुलगा निवास महापुरे याने फिर्याद दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, फिर्यादीमधील तपशील समजू शकला नाही.