सातारा – दीपोत्सवातील लक्ष्मीपूजन रविवारी (दि. 12) आहे. लक्ष्मीपूजनाच्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी खण आळी, देवी चौक, मोती चौक, पोवई नाका, सराफ बाजारात शुक्रवारी मोठी गर्दी केली होती. गोलबागेभोवती आणि राजपथावरील पदपथांवर विक्रेत्यांनी आपली दुकाने मांडली होती.
साहित्याची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याने छोट्या व्यावसायिकांची दिवाळी गोड होत आहे. लक्ष्मीपूजनानिमित्त शहरात मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.साताऱ्यात दिवसभर ढगाळ हवामान आणि सायंकाळी थंडगार हवा असतानाही सातारकर खरेदीसाठी बाहेर पडले होते. त्यामुळे गर्दीने सगळे चौक व्यापून टाकले होते.
लक्ष्मीपूजनासाठी लाह्या, बत्तासे, रांगोळ्या, केरसुण्या खरेदीसाठी नागरिकांची, तर तयार किल्ले आणि किल्ल्यांवर ठेवायच्या वस्तूंच्या खरेदीसाठी लहान मुलांची गर्दी दिसत होती. लक्ष्मीपूजनाला व्यापारी वर्ग खतावणीचे पूजन करतात. या खतावण्यांना मोठी मागणी होती. साहित्य खरेदीसाठी सातारकर सकाळपासूनच घराबाहेर पडले होते. सायंकाळी 5 वाजल्यानंतर शहरातील रस्त्यांवर गर्दी वाढत गेली.
लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधण्यासाठी सोने खरेदीसाठी नागरिकांनी सराफ बाजारात गर्दी केली होती. सोन्याचा भाव प्रतितोळा 62 हजार 500 रुपये असूनही सातारकर खरेदी करत होते. बाजारपेठेत लक्ष्मीजोडी दीडशे रुपये, पणत्या शंभर ते दीडशे रुपये, लाह्या, बत्तासे पाकिट 20 रुपये, पाच नगांचे बोळके साठ रुपये, लक्ष्मीपट्टी 20 ते 40 रुपये, हळद-कुंकू पाकीट 20 रुपये या दराने विकली जात होती.