कराड – साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) च्यावतीने दिले जाणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये 2022-23 या गळीत हंगामातील डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊसविकास व संवर्धन पुरस्कार रेठरे बुद्रुक, ता. कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यास, तर दक्षिण विभागातील सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार धावरवाडी, ता. कराड येथील जयवंत शुगर्सला जाहीर झाला आहे. या पुरस्कारांमुळे कृष्णा कारखान्याचे चेअरमन आणि जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या नियोजनबद्ध, पारदर्शक व प्रगतिशील कारभारावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले असून, दोन्ही कारखान्यांच्या शिरपेचात मानाचे आणखी तुरे रोवले गेले आहेत.
साखर क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल व्हीएसआयकडून दरवर्षी पुरस्कार दिले जातात. यंदाच्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा कारखान्यात जयवंत आदर्श कृषी योजनेच्या माध्यमातून ऊसविकास व संवर्धन उपक्रम राबवले जात आहेत. यात त्रिस्तरीय ऊस बेणेमळ्याद्वारे ऊस बियाणे वाटप, हंगामनिहाय व जातनिहाय लागवड योजना राबवण्यात सातत्य, ठिबक सिंचन योजनेची प्रभावी अंमलबजावणी, बायोकम्पोस्ट खत वाटप, शेतकरी आणि कर्मचार्यांसाठी प्रशिक्षण, आधुनिक खोडवा व्यवस्थापन योजनेची प्रभावी अंमलबजावणी, माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळेत परीक्षणावर भर, जीवाणू खत प्रयोगशाळेत वेगवेगळ्या खतांचे उत्पादन आणि वितरण केले जाते.
जयवंत शुगर्समध्ये 100 टक्क्यांहून अधिक, म्हणजे 147.74 टक्के गाळप क्षमतेचा वापर करण्यात आला आहे. रिड्युस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन 96.33 टक्के आहे. विशेष म्हणजे जयवंत शुगर्सने साखर तयार करण्यासाठी फक्त 16 टक्के बगॅसचा वापर केला आहे. साखर तयार करण्यासाठी वाफेचा वापर 31.99 टक्के आणि वीजवापर 22.46 किलोवॅट प्रतिटन ऊस इतका आहे. या दोन्ही कारखान्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत व्हीएसआयने घेतली आहे. या पुरस्कारांचे वितरण गुरुवार, दि. 11 रोजी पुणे येथे व्हीएसआयच्या वार्षिक सभेत केले जाणार आहे. या यशाबद्दल दोन्ही कारखान्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
‘जयवंत’च्या शेतकरी सभासदास ऊसभूषण पुरस्कार
जयवंत शुगर्सचे सुर्ली (ता. कोरेगाव) येथील ऊसउत्पादक सभासद सुहास मधुकांत पाटील यांनी हेक्टरी 299.24 मेट्रिक टन ऊस उत्पादन पूर्व हंगामात घेतले आहे. त्यांना दक्षिण विभागातील ऊसभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.