सातारा -कायद्याच्या निकषावर टिकणारे आरक्षण आणि ते आरक्षण चौकटीत बसवण्याचे मोठे आव्हान. अशा परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण देण्याची आग्रही भूमिका मांडली जात आहे. महाराष्ट्रातील सरकार असो अथवा दिल्लीतील, मराठ्यांना न्याय द्यावाच लागेल. कायद्याच्या निकषावर टिकणारे आरक्षण देण्यासंदर्भात एक मराठा समाजाचा घटक म्हणून मी माझी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ मांडेन, असे स्पष्ट आश्वासन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मराठा आंदोलकांना दिले.
मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या माध्यमातून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक अडवण्यात आली होती. सुकाणू समितीचे पदाधिकारी ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर, ज्येष्ठ पत्रकार हरीश पाटणे, सुनील काटकर इत्यादी पदाधिकाऱ्यांनी मोर्चात सहभाग नोंदवून आरक्षणाच्या लढ्याची धार कायम ठेवली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंगळवारी आंदोलनस्थळी भेट देऊन स्वतः आंदोलक म्हणून आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “”मी येथे आमदार म्हणून आलो नाही. मराठा समाजाचा एक घटक म्हणून मराठा आरक्षणाला पाठिंबा देणे आणि ही जनभावना राज्य शासनापर्यंत पोहोचवणे हे मी माझे कर्तव्य समजतो आणि ते मी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. मी मराठा समाजापेक्षा मोठा नाही. समाजातील ताकदीमुळेच आम्ही आहोत ही वस्तुस्थिती आहे.
हे आंदोलन समन्वयकांच्या हाती राहिले नाही ते जनतेच्या हाती गेले आहे. आता समाजाच्या या आग्रही भूमिकेमुळे राज्य शासन असो वा केंद्र शासन त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका घ्यावीच लागेल. मराठ्यांचा आवाज कधीही दडपला जाणार नाही हा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे, मराठ्यांच्या न्याय हक्काची ही लढाई आहे.”
आमच्या घराण्यावर आपल्या सर्वांचे प्रेम आहे. मी असो अथवा उदयनराजे असो शिवछत्रपतींच्या घराण्यावर तुम्ही सर्वजण प्रेम करणारे आहात. त्यामुळे आमदारकी असो व खासदारकी यापेक्षा तुमचे प्रेम महत्त्वाचे आहे. पदे येतात जातात, या कायमच्या गोष्टी नाहीत. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यावरील तुमचे प्रेम, श्रद्धा कायम राहावी यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, अशी प्रामाणिक भूमिका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मांडली.
परळी खोऱ्यातील नागरिक आंदोलनस्थळी
“एक दिवस समाजासाठी’ या अभिनव उपक्रमाचे सातारा शहर व परिसरात चांगले स्वागत झाले आहे. सातारा शहरालगतच्या सातारा तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधून दररोज मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी परळी खोऱ्यातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक राजू भोसले यांच्या नेतृत्वाखाली येथील सुमारे 500 नागरिकांनी त्यांच्या नेतृत्वाखाली बाइक रॅली काढून परळी ते सातारा असा प्रवास केला. “एक मराठा लाख मराठा’ “मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे,’ अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले तात्या सावंत, प्रकाश भोसले तसेच महिला आंदोलकांना यावेळी उत्स्फूर्त पाठिंबा देण्यात आला.