सातारा – बालेवाडी (पुणे) येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक 2023 स्पर्धेत सातारा एक्सप्रेस म्हणून पुढे येत असलेली खर्शी (ता.जावळी) येथील व सध्या सातारा येथे वास्तव्यास असेलेली धावपट्टू सुदेष्णा शिवणकर ही महाराष्ट्रातील सर्वात वेगवान धावपट्टू ठरली आहे. या यशाबद्दल तिचे सर्वच स्तरातील मान्यवरांकडून अभिनंदन केले जात आहे.
पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर बुधवारी ऍथलेटिक्स ऍक्शनला सुरुवात झाली. यामध्ये पुण्याचा प्रणव गुरव व खेलो इंडिया गेम्सची विजेती साताऱ्याची कन्या असलेल्या सुदेष्णा शिवणकर यांनी महाराष्ट्रातील सर्वात धावपट्टू होण्याचा बहुमान पटकावला. निखिल पाटील (10.61 से) आणि किरण भोसले (10.74से) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळवले आहेत.
खेलो इंडिया गेम्सच्या विजेत्या सुदेष्णा शिवणकरने हिने या स्पर्धेत 11.92 सेकंदात विजयीपद पटकावत महिलांची 100 मीटर स्प्रिंट जिंकली. मुंबईच्या सरोज शेट्टीने 12.13 सेकंदात रौप्य आणि साताऱ्याच्या चैत्राली गुजरने 12.35 सेकंदात कांस्यपदक मिळविले. महिलांच्या कुस्तीमध्ये 50 किलो गटात सातारच्या श्रेया मांडवे (सातारा) हिने कास्यपदक पटकावले.
सातारा पोलीस दलातील हणमंतराव शिवणकर यांची सुदेष्णा कन्या असून त्यांच्या प्रोत्साहनामुळे सुदेष्णा यशाच्या पायऱ्या चढत आहे. याबरोबरच सुदेष्णाला निवृत्त तालुका क्रीडा अधिकारी बळवंत बाबर, सायन्य कॉलेजचे प्राचार्य बी. टी. जाधव, फिजीकल डायरेक्टर उदय शिंदे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तिच्या यशाने पुन्हा एकदा जिल्ह्याची मान उंचावली आहे.