उंब्रज – तळबीड, (ता. कराड) येथील मानकर वस्तीवर राहत्या घरी महिलेच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात आला. गुरुवारी दि. 5 रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, महिलेचा खून चोरीच्या उद्देशाने झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अवघ्या 4 तासात तळबीड पोलिसांनी संशयित आरोपीस गजाआड केले आहे. संशयिताने महिलने दारू प्यायला पैसे न दिल्याने तिचा खून केल्याचे व चोरी केल्याचे सांगितले.
विमल कृष्णत चव्हाण (वय 70) रा. मानकर वस्ती तळबीड ता. कराड असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुरज शरद मोहिते (वय 29) या संशयितस अटक केली आहे. याबाबत मृत महिलेचा मुलगा प्रकाश चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी प्रकाश कृष्णत चव्हाण हे आपल्या आई, पत्नी समवेत एक वर्षापासून तळबीड येथील मानकर वस्तीत राहत आहेत. ते मुळचे निपाणीचे (कर्नाटक) आहेत. प्रकाश चव्हाण एमआयडीसीमध्ये हमालीचे काम करतात. तर त्यांची पत्नी एका कंपनीत कामास आहे. प्रकाशची आई विमल चव्हाण या काही महिन्यांपूर्वीच त्यांच्याकडे राहण्यास आली होती.
दरम्यान, गुरुवारी सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास प्रकाश चव्हाण हे आपल्या पत्नीस एमआयडीसीतील कंपनीत कामावर सोडण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना हमालीचे काम नसल्यामुळे ते 10:30 वाजता परत आपल्या घरी आले. यावेळी त्यांना आई हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेली दिसली. जवळ जाऊन पाहिले असता त्यांच्या आईच्या डोक्यात कुणीतरी मोठा दगड घातला होता. हे पाहून प्रकाश चव्हाण यांनी आरडाओरडा करत शेजारच्या लोकांना बोलावले. खून झाल्याचे समजताच घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. यात फिर्यादी, तसेच आजूबाजूचे साक्षिदार लोकांचेकडे विचारपूस केली. तेव्हा चव्हाण यांच्या घराजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीने मृत महिलेस दारु पिण्याकरीता पैसे मागितले होते. परंतू, महिलेने त्यास पैसे दिले नव्हते. त्याबाबत त्या महिलेने तिचा मुलगा (फिर्यादी) यास घरी आल्यानंतर सांगितले होते. दारु पिण्याकरीता पैसे पाहिजे असल्याने त्या व्यक्तीने महिलेचा खून करुन तिचे गळ्यातील सोन्याची बोरमाळ व कानातील कर्नफुल चोरी केले असल्याचा संशय व्यक्त झाला होता.
स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास व स.पो.नि. जयश्री पाटील यांनी संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली. संशयित व्यक्ती हा उसाच्या रानात लपून बसला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात पोलिसांनी घेतले.
पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी त्याच्याकडे विचारपूस केली. तेव्हा त्याने खून केल्याची कबुली दिली. पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर व कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, स्वप्नील दौंड, धीरज महाडीक, विशाल पवार, मोहसिन मोमीन, पंकज बेसके व तळबीड पोलीस ठाण्याकडील सहायक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील, पोलीस अंमलदार बाकले, पिसाळ, ओंबासे, दिक्षीत, विभुते यांनी सदरची कारवाई केली.