कराड -खरेदी केलेल्या प्लॉटची तलाठ्याने केलेली नोंद प्रमाणित करण्यासाठी उंडाळे, ता. कराड येथील मंडलाधिकारी नागेश निकम याने 20 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सांगलीतील पथकाने मंगळवारी ही कारवाई केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदाराने खरेदी केलेल्या गुंठेवारी प्लॉटची तलाठ्याने केलेली नोंद प्रमाणित करायची होती. त्यासाठी संबंधित तक्रारदाराकडे उंडाळेचा मंडलाधिकारी नागेश निकमने 27 हजार रुपयांची लाच मागितली होती.
त्यावर तडजोड होऊन 20 हजार रुपये देण्याचे ठरले. संबधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार मंडलाधिकारी नागेश निकम याच्यावर सांगलीच्या पथकाने गुन्हा नोंदवला. लाचलुचपत प्रतिबंधन विभागाचे सांगली येथील पोलीस निरीक्षक प्रशांत चौगुले, हवालदार संजय संकपाळ, धनंजय खाडे, प्रीतम चौगुले, अजित पाटील, वीणा जाधव, बाळासाहेब पवार यांनी ही कारवाई केली.