पुसेगाव (प्रतिनिधी)- आमदार महेश शिंदे यांच्या संकल्पनेतून मकर संक्रांतीचे औचित्य साधून १७ जानेवारीला आयोजित केलेल्या मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते आणि कलाकारांचा समावेश असलेल्या हास्यसंक्रांत या विशेष कार्यक्रमासासाठी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून जनसागर लोटला. महिलांसह नागरिकांची मोठी उपस्थिती होती. दिग्गज कलाकारांनी दिलासखुलास मनोरंजन केले.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याहस्ते व आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी कोरेगाव मतदारसंघाच्या वाटचालीमध्ये मोलाचे योगदान देणार्या मान्यवरांचा विशेष गौरव करण्यात आला.
आमदार महेश शिंदे यांच्यासह काडसिध्द कोविड टास्क फोर्सच्या अध्यक्षा डॉ. अरुणाताई बर्गे, डॉ. विजय बर्गे, डॉ. प्रियाताई महेश शिंदे, डॉ. संजय देशमुख, डॉ. मंजुषा देशमुख, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे नेते मनोजदादा घोरपडे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोषआबा जाधव, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, माजी सदस्य संदीपभाऊ शिंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य रणधीरशेठ जाधव, खटावचे युवा नेते राहुल पाटील, बुधचे सरपंच अभयसिंह राजेघाटगे यांच्या हस्ते प्रख्यात धन्वंतरी डॉ. सच्चिदानंद गोसावी, डॉ. रमेश पाटील, कॅप्टन महादेव भोसले, हरिभक्त परायण नामदेव भोसले व भाडळे खोऱ्यातील नेते विजयराव घोरपडे यांचा कोरेगाव मतदारसंघाच्या वाटचालीमध्ये मोलाचे योगदान दिल्याबद्दल यावेळी विशेष गौरव करण्यात आला.
कलाकार गौरव मोरे, रोहित माने, प्रसाद खांडेकर, वनिता खरात, नम्रता संभेराव या हास्यजत्रामधील नामवंत कलाकारांबरोबरच प्रसिध्द नृत्यांगणा मीरा जोशी व सहकलाकारांनी अत्यंत चांगले व नेटके सादरीकरण केले. अभिनेता संदीप पाठक यांनी या बहारदार कार्यक्रमाचे निवेदन केले. कोरेगावनजिकचे सुपूत्र व चित्रपट निर्माता -दिग्दर्शक अतुल जगदाळे व युवा कार्यकर्ते श्रीकांत बर्गे यांचे उत्कृष्ट संयोजन या कार्यक्रमाला लाभले. नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, माजी नगरसेवक, विविध गावचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, विकास सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक,कार्यकर्त्यांनी हास्यसंक्रांत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
प्रशासकीय अधिकारी सहकुटुंब रमले हास्यसोहळ्यात
आमदार महेश शिंदे यांनी कोरोना काळानंतर आनंदाचा क्षण म्हणून हास्यसंक्रांत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मतदारसंघातील सामान्यातील सामान्य महिलेला आपल्या कुटुंबातील सदस्यांसह कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा, यासाठी अत्यंत निटनेटके नियोजन करण्यात आले होते. हळदी कुंकू कार्यक्रम देखील महिला आघाडीच्यावतीने घेण्यात आला. प्रांताधिकारी ज्योती पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, तहसीलदार अमोल कदम, पंचायत समितीच्या प्रशासक तथा गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे, उपनिरीक्षक अशोक राऊत, जोतिराम बर्गे यांच्यासह सर्व प्रशासकीय खातेप्रमुखांनी या कार्यक्रमाचा सहकुटुंब आस्वाद घेतला. एकूणच प्रशासकीय अधिकारी सहकुटुंब हास्यसोहळ्यात रमून गेले होते.