सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात 14 केंद्रांवर कोविड लसीकरण केले जात होते. त्यामध्ये दोन केंद्रांची वाढ करण्यात आल्याने 16 केंद्रांवर लसीकरण सुरु आहे.
देशभरात 16 जानेवारीला कोविड लसीकरणाला सुरुवात झाली. यामध्ये आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर जिल्ह्यातील 24 हजार 789 कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली होती. पहिल्या टप्यात नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड लस दिली जात आहे.
जिल्ह्यात सुरुवातीला 14 केंद्रांवर लसीकरण केले जात होते. कराड व सातारा येथे 27 जानेवारीपासून प्रत्येकी एक नवीन केंद्र सुरू करण्यात आले आहे. लसीकरणाचा कोटा संपल्यानंतर संबंधित केंद्र बंद करून नवीन ठिकाणी सुरू केले जात आहे.
मायणीतील केंद्र बंद करून वडूजमध्ये नवे केंद्र सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6 हजार 748 कर्मचाऱ्यांना कोविडची लस देण्यात आली आहे. लसीकरणानंतर कोणालाही गंभीर स्वरुपाची रिऍक्शन आली नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले.