सातारा – छत्रपती शिवाजी महाराजांनी आपणा सर्वांना लोकशाहीचा विचार दिला. त्यामुळे लोकांच्या सहभागाचेच ध्येय धोरण अंगिकारत आम्ही पुढे जात आहोत. अशा स्थितीत आज लोकांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या योग्य मार्गदर्शनासाठी आयोजित केलेल्या प्रदर्शनातून आपल्याला नवनवीन विकास आणि तंत्रज्ञानाची ओळख होईल. त्यामुळे हा महोत्सव म्हणजे सातारकरांसाठी पर्वणी ठरेल, असे प्रतिपादन खा. उदयनराजे भोसले यांनी केले.
स्मार्ट एक्स्पो ग्रुपच्या व्यवस्थापनाखाली आणि श्रीमंत छ. उदयनराजे भोसले मित्र समूह, जय सोशल फाउंडेशनच्यावतीने आयोजित छत्रपती कृषी, औद्योगिक, वाहन व पशू-पक्षी प्रदर्शन 2023 चे उद्घाटन आज येथील जिल्हा परिषद मैदानावर झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ कृषी तज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, माजी सभापती सुनील काटकर, स्मार्ट एक्स्पोचे संयोजक सोमनाथ शेटे, जय सोशल फाउंडेशनचे सागर भोसले यांच्यासह जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे, उपविभागीय कृषी अधिकारी गुरुदास काळे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री. परिहार, कृषी विकास अधिकारी विजय माईनकर, प्रीतम कळसकर, शिवानी कळसकर, माजी नगराध्यक्ष रंजना रावत, रेखा शेटे, जितेंद्र खानविलकर,
पंकज चव्हाण, संग्राम बर्गे, काका धुमाळ यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. बुधाजीराव मुळीक म्हणाले, सध्या शेतकऱ्यांना भीतीदायक ठरणारा लम्पी रोग साताऱ्यात मात्र कमी आहे. अशी प्रदर्शने खऱ्या अर्थाने मार्गदर्शनाचा केंद्रबिंदू ठरेल असे वाटते. तब्बल 225 हून अधिक नामवंत देशातील कंपन्यांच्या विक्री स्टॉलचा सहभाग असलेले हे प्रदर्शन पुढील पाच दिवस सातारकरांना एक पर्वणीच ठरेल. सोमनाथ शेटे, रेखा शेटे व हेमलता भोसले यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सुनील मोरे यांनी सूत्रसंचालन केले. छत्रपती कृषी महोत्सवात दि. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत देशी- विदेशी जातीच्या श्वानांचा डॉग शो होणार आहे.