पुणे – पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवणाऱ्या शहरांमध्ये पुणे शहराचा समावेश केंद्र शासनाने केला आहे. या स्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेला केंद्र शासनाने तब्बल 250 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून हा निधी शहरी पूर व्यवस्थापनासाठी 2023 ते 2026 या काळात महापलिकेस टप्प्याटप्प्याने हा निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
दरम्यान, स्वत: आयुक्तांनी मागील आठवड्यात दिल्ली येथे या आराखड्याचे सादरीकरण केले. त्यानुसार या निधीतील 150 कोटी रुपये पावसाळी जलवाहिन्यांसाठी, तर 100 कोटी रुपये आपत्ती व्यवस्थापनाच्या इतर उपाययोजनांवर खर्च केला जाणार आहे. हा निधी एकत्रित मिळेल, अशी अपेक्षा पालिकेला होती. मात्र, पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत टप्प्याटप्प्याने हे पैसे मिळणार आहेत. गेल्या काही वर्षांत शहरात अतिवृष्टीसदृश पाऊस होत आहे. त्यामुळे अचानक पूरस्थिती उद्भवते. तेथे उपाययोजना केल्या जाणार आहेत.
ही करणार कामे
- पावसाचे पाणी टेकडीच्या पायथ्याला अडविणे
- टेकड्यांवर चर खोदणे, पर्जन्यजल साठवणे
- रेनवॉटर हार्वेस्टिंग वाढवणे
- जांभूळवाडी, कात्रज, पाषाण तलावांतील गाळ काढणे
- नवीन पावसाळी वाहिन्या टाकणे