मेढा – सातारा – जावळी मतदार संघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मध्यस्तीला यश येवून बोंडरवाडी ग्रामस्थांनी बोंडारवाडी धरणाच्या सर्व्हेला अखेर मान्यता दिली असून त्यामुळे प्रारंभीचा विषय मार्गी लागला आहे. याबद्दल ग्रामस्थांहस सर्वांनीच आनंद व्यक्त करून आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार मानले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, 54 गावाच्या पिण्याच्या व शेती सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून 1 टीएमसी धरणाला मान्यता मिळाली असून सदर धरणाचे सर्वे करण्यासाठी 80 लाख रुपये मंजूर असून सर्वेची टेंडर प्रक्रिया पूर्ण होवून वर्कऑर्डर झालेली आहे. मात्र विविध मागण्यासाठी या धरणाचा सर्व्हे करण्यास बोंडारवाडी ग्रामस्थांचा विरोध होता.
यावर तोडगा काढण्यासाठी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बोंडारवाडी येथे स्थानिक ग्रामस्थ, जिल्हा बॅंकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, जावळीचे प्रांताधिकारी तहसीलदार दादासाहेब दराडे, तहसिलदार हणमंतराव कोळेकर, जलसंपदा विभाग तसेच पुनर्वसन व महसूल विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
यामध्ये आ. शिवेंद्रराजे यांच्या शब्दावर विश्वास ठेवत ग्रामस्थांनी सर्व्हे करण्यास मान्यता दिली. यावेळी कमीत कमी जमीन बाधित होईल आणि 1 टीएमसीचे धरण होईल असा सर्व्हे करण्याच्या अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी शेवटपर्यंत बोंडारवाडी ग्रामस्थांच्या सोबत राहणार असून सर्व्हे झालेनंतर योग्य ती जागा ठरवून ग्रामस्थांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येईल असे सांगतानाच प्रसंगी निधी वाढवून घेतला जाईल, असा शब्दही दिला. तेव्हा ग्रामस्थांनी सर्व्हे कराण्यास मान्यता दिली. याबदल आ. शिवेंद्रराजे भोसले व ज्ञानदेव रांजणे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.