सातारा – सातारा जिल्ह्यातील संबंधित विभागांकडून प्राप्त होणारे 1967 पूर्वीचे कुणबी जातीचा उल्लेख असलेले अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://www.satara.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.
मराठा समाजातील ज्या व्यक्तींनी मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, जातीच्या जात प्रमाणपत्राची मागणी केली असेल अशा व्यक्तींनी सादर केलेल्या निजामकालीन महसूली अभिलेखात शैक्षणिक अभिलेखात तसेच अन्य अनुषंगिक समर्थनीय अभिलेखात जर त्यांच्या वंशावळीचा उल्लेख, कुणबी असा असेल तर अशा व्यक्तींनी सादर केलेल्या पुराव्यांची काटेकोर तपासणी करुन त्यांना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र प्रदान करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.
तसेच मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी न्यायमुर्ती संदिप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात मराठा समाजातील संबंधित व्यक्तींनी सक्षम प्राधिकारी यांचेकडे सादर केलेल्या पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी कशी करावी व तपासणीअंती कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती निश्चित करुन अहवाल शासनास सादर करण्यासाठी न्यायमूर्ती संदिप शिंदे (निवृत्त) समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी वाढविण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे.
मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक ते दस्तऐवज आणि पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा- कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी आणि क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयांनी कुणबी जातीचे दाखले देण्याबाबत प्रक्रीया सुलभ करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत.
त्यासाठी शासन स्तरावरुन शासकीय विभाग निहाय 1967 पूर्वीचे कुणबी जातीचे खालील नमूद केलेले अभिलेख तपासणी करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील संबंधित विभागांकडून प्राप्त होणारे 1967 पूर्वीचे कुणबी जातीचा उल्लेख असलेले उपरोक्त नमूद अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://www.satara.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.