कराड – आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान, मुंबई यांच्यावतीने मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील सातारकरांना त्यांनी केलेल्या विशेष कार्याबद्दल सातारा रत्नभूषण पुरस्कार प्रदान केला जातो. सन 2023 साठीचा बॅंकिंग विभागातील गौरवास्पद कार्याबद्दलचा सातारा भूषण पुरस्कार कराड अर्बन बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांना परम पूज्य सेवागिरी महाराज मठ, पुसेगावचे मठाधिपती श्रीमंत सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सोमवार, दि. 23 रोजी मुंबई येथील श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्ट शिवाजी मंदिर सभागृहामध्ये सदरचा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाराम निकम व सहकारी, सीए. दिलीप गुरव, कराड अर्बन बॅंकेचे माजी अध्यक्ष व कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ. सुभाष एरम उपस्थित होते.
सीए. दिलीप गुरव सन 1996 साली कराड अर्बन बॅंकेच्या सेवेत उपमुख्य कार्यकारी या पदावर रूजू झाले. कार्यतत्परता, अचूक व धाडसी निर्णय, बॅंकेच्या गुंतवणूक व वित्तपुरवठ्याबाबतचा सूक्ष्म अभ्यास इ. गुणांमुळे सन 2005 साली बॅंकेने त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी-पदी बढती दिली. कमी वयात नागरी सहकारी बॅंकेत मुख्य कार्यकारी पद सांभाळणारे सीए. दिलीप गुरव एकमेव होते. यापदाचा कार्यभार स्वीकारतेवेळी बॅंकेचा एकूण व्यवसाय 660 कोटी रुपये होता. तोच आज सतरा वर्षात 4,600 कोटी झाला आहे.
त्यांच्या काळात बॅंकेने 2007 साली सांगली येथील श्री पार्श्वनाथ सह. बॅंक, तसेच सन 2017 मध्ये सातारा येथील अजिंक्यतारा सह. बॅंक व अजिंक्यतारा महिला सह. बॅंक अशा तीन बॅंकांचे विलिनीकरण करून घेतले. सहकारातील एक यशस्वी विलिनीकरण म्हणून याकडे पाहिले जाते. कराड अर्बन बॅंकेने आर्थिक स्थिती भक्कम ठेवतानाच कृतीतून सामाजिक बांधिलकी जपली आहे. सीए. दिलीप गुरव हे अर्बन परिवारातील अर्बन बझार, मूक बधिर शाळा इ. संलग्न संस्थांना बहुमोल मार्गदर्शन करतात.
सीए. दिलीप गुरव हे सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बॅंकींग विषयी मार्गदर्शन करत असतात. तसेच त्यांनी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया, सहकार खाते यांच्याद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांना निमंत्रित प्रशिक्षक म्हणून सहभागी बॅंकांना मार्गदर्शन करत असतात. त्यांनी बॅंकींग क्षेत्रात केलेल्या याच कार्याचा सन्मान म्हणून त्यांना सातारा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
सातारा भूषण पुरस्काराबद्दल सीए. दिलीप गुरव यांचे कराड अर्बन बॅंकेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, सर्व संचालक, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी व सदस्य, वरिष्ठ अधिकारी आणि सेवक यांनी अभिनंदन केले. तसेच बॅंकेचे सभासद, ग्राहक, हितचिंतक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.