सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीस मूर्त स्वरूप आले आहे. जागा हस्तांतरण, 100 विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि 500 खाटांचे रुग्णालय यांच्या उभारणीसाठी 495 कोटी 46 लाख रुपये निधीला प्रशासकीय मान्यता मिळवून दिल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणखी मोठे यश मिळाले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयासाठी अधिष्ठाता, प्राध्यापक यासह 510 पदांची निश्चिती करण्यात आली आहे. ही पदे भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिल्याने लवकरच ही पदे भरली जाणार आहेत. महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा होणार आहे. हा प्रश्न मार्गी लावल्याद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
सातारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न गेले अनेक महिने गाजत होता. महाविद्यालयाला मंजुरी मिळाल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. अजित पवार यांची भेट घेऊन वाढीव जागा हस्तांतरणाचा प्रश्न सोडवला. वाढीव 60 एकर जागा हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आला.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीला प्राधान्य देत ना. अजित पवार व ना. अमित देशमुख यांच्या सूचनेवरून महाविद्यालय, रुग्णालय व अनुषांगिक बांधकामाच्या अंदाजपत्रकास राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मान्यता दिली. त्यासाठी 495 कोटी 46 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
या महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या पदांची निर्मिती करावी आणि ही पदे भरून प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू करण्याची मागणी आ. शिवेंद्रराजे यांनी ना. पवार यांना त्याच वेळी केली होती. याबाबत आ. शिवेंद्रराजे यांनी पत्रव्यवहारही केला होता. महाविद्यालयासाठी निधी उपलब्ध झाल्याने उभारणीही सुरू होणार आहे. प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू होण्यासाठी आवश्यक पदांची निश्चिती आणि ती भरण्यास मान्यता मिळणे आवश्यक होते.
आ. शिवेंद्रराजे यांच्या मागणीनुसार भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकांनुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने विविध संवर्गातील 510 पदे निर्माण करण्यास, यंत्रसामग्री, आवर्ती खर्च, बाह्यस्रोत खर्च व शैक्षणिक रुग्णालय निर्मितीसाठी येणाऱ्या खर्चासाठी निधी देण्यास मान्यता दिली आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी अधिष्ठाता, पाच प्राध्यापक, 14 सहयोगी प्राध्यापक, मुख्य प्रशासकीय अधिकारी, 18 सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, ग्रांथपाल आदी 510 पदे भरण्यास मान्यता मिळाली आहे.
एका पाठोपाठ एक विकासकामांचा धडाका
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळे कास धरण उंची वाढवण्याचा प्रश्न मार्गी लागला असूनण सातारकरांचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे. शहराच्या हद्दवाढीला मंजुरी मिळवून आ. शिवेंद्रराजे यांनी त्रिशंकू भागही विकासाच्या प्रवाहात आणला आहे. आता वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्नही त्यांनी पूर्णपणे मार्गी लावला आहे. विकासकामे मार्गी लावण्याचा धडाका आ. शिवेंद्रराजेंनी सुरू ठेवला आहे. त्यांच्या धडाकेबाज व लोकाभिमुख कार्यपद्धतीबाबत जिल्हावासीय समाधान व्यक्त करत आहेत.