सातारा – मराठी स्वराज्यात कायम अजिंक्य राहिलेल्या, स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील किल्ला ‘ अजिंक्यतारा ‘ ची प्रतिकृती नागपूरच्या शिवगौरव प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी तयार केली आहे. नागपुरात साकारण्यात आलेला “अजिंक्यतारा’ नागपूरकरांची गर्दी खेचत असून नागरिकांची पहिली पसंती ठरत आहे.
नागपुरातील महाल येथे हा किल्ला साकारण्यात आला आहे. यासाठी शिवगौरव प्रतिष्ठानच्या मावळ्याना बरीच पूर्वतयारी करावी लागली. यासाठी त्यांनी प्रत्यक्ष सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ल्याला भेट दिली. साताराचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी शिवगौरव प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे साताऱ्यात स्वागत केले. अजिंक्यताराची सफर घडवत किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती दिली. मावळ्यांच्या या भेटीला श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या भेटीच्या आणि माहितीच्या आधारे जिओ मॅपिंग, ड्राइंग करत दिवाळीच्या 15-20 दिवसांपूर्वी किल्ले निर्मितीची प्रक्रिया सुरू केली. तब्बल तीन ट्रॅक्टर मातीचा वापर करीत हुबेहूब किल्ले अजिंक्यतारा ची प्रतिकृती तयार केली. गडावरचा मुख्य दरवाजा, दक्षिण दरवाजा, गडावरचे कोठार, राजसदर, महादेव मंदिर, मंगळाई मंदिर, कैदखाना, सात तळे आदी किल्ल्यावर असले वस्तूंच्या प्रतिकृती हुबेहूब साकारल्या आहेत. नागपुरात दरवर्षी होणाऱ्या शिववैभव गडकिल्ले स्पर्धेत अजिंक्यताराची ही प्रतिकृती सहभागी करून घेण्यात आली आहे. ही प्रतिकृती साकारण्यासाठी शिवगौराव प्रतिष्ठानचे रोहित लाड, पियूष भराटे, संजय नांदुरकर, अमेय महाडिक, आदित्य खंडागळे, नितीन येरंडे यांनी मोलाची भूमिका वठविली.