एसटी प्रवास होणार आणखी आरामदायी; प्रवाशांमधून समाधान
सातारा – प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने येत्या आठवडाभरात प्रथमच सातारा आगाराला दहा हिरकणी बसेस (सेमी लक्झरी) मिळणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एस.टी प्रवास आरामदायी होणार आहे. प्रवाशांना एस.टी च्या माध्यमातून सुविधाही चांगल्या दिल्या जात असल्याने प्रवाशांची संख्याही वाढत आहे. एस. टी. महामंडळाकडून मिळत असलेल्या सुविधांबद्दल प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
करोनाच्या संकटानंतर मागील दीड ते दोन वर्षात एस.टी सुरळीत सुरु झाल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. करोना काळात सुमारे वर्षभर एस.टी बसेस जागेवरच उभ्या राहिल्याने अनेक बस नादुरुस्त झाल्याचे पाहावयास मिळाले. त्यानंतर अनेक बसेस स्क्रॅपमध्ये टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे सातारा विभागाने नवीन बसेसची मागणी केली होती. त्यानुसार जिल्ह्यात सातारा एस.टी डेपोला एस.टीच्या स्व:मालकीच्या नवीन दहा हिरकणी बसेस मिळणार आहे.
एस.टी महामंडळाने प्रवाशांना आरामदायी सुखकर प्रवासासाठी हिरकणी ही गुलाबी रंगाची एस.टी बसेस तयार केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत ही बस सातारा विभागाला मिळाली नव्हती. ही बस मिळण्यासाठी सातारा विभागाने प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार आठवडाभरात हिरकणी बस मिळणार असल्याने एस.टीच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने एस.टी प्रवासाच्या तिकिट दरात महिलांना 50 टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे महिलांची प्रवासाला मोठी गर्दी होते असून उत्पन्नातही वाढ होत आहे.
दरम्यान सातारा-स्वारगेट मार्ग राज्यात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्यापैकी एक मार्ग आहे. एस.टी डेपोंमध्ये बसेसची संख्या कमी प्रमाणात असल्याने या मार्गावर प्रवाशांना अनेकदा ताटकळत बसावे लागते. त्यामुळे नव्याने उपलब्ध होणाऱ्या हिरकणी बसेस सातारा-स्वारगेट मार्गावर सोडल्यास प्रवाशांना आरामदायी प्रवास घडून एस.टी च्या उत्पन्नात देखील भर पडणार आहे. त्यामुळे या मार्गावर नवीन बसेस देण्यात याव्यात अशी मागणी होत आहे.