सातारा – सातारा जिल्ह्यातील एका गावात भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार कांता नलावडे यांच्या बंद असलेल्या बंगल्याच्या मागील आवारात एका महिलेचा कुजलेला मृतदेह अर्धवट पुरलेल्या स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कांता नलावडे यांच्या कुटुंबीयांना बंगल्याचा परिसर साफ करताना मृतदेह दिसून आला. त्यांचे कुटुंबिय या बंगल्यात अधून मधून जात असतात.
बंगला काही काळ कुलूप लाऊन बंद असल्याने जेव्हा केव्हा हे कांता नलावडे किंवा त्यांचे कुटुंबीय येथे राहायला येतात तेव्हा ते बंगल्याच्या परिसराची साफसफाई करीत असतात. ही साफसफाई केली जात असतानाच त्यांना हा मृतदेह सापडल्याने कुटुंबीयांनी ताबडतोब पोलिसांना याची माहिती दिली, त्यांनी तपास सुरू केला आहे.
या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख म्हणाले, आम्ही सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास करीत आहोत. मृतदेहाची ओळख पटवण्याचे कामही वेगाने सुरू आहे.