नगरपालिकेची धडक मोहीम : पाच दिवसांचा अल्टीमेटम
सासवड – सासवड नगरपालिकेच्या वतीने 2019-20 मध्ये शहरात कर वसुलीची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. मोहिमेअंतर्गत नगर पालिकेने जप्ती पथक तयार केले आहे. पथकाच्या माध्यमातून सासवड शहरातील इंडस मोबाइल कंपनीचे दोन टॉवर व रिलायन्सचा कंपनीचा एक टॉवर, असे तीन टॉवर सील करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे कर थकविणाऱ्यांना चांगलीच जरब बसली आहे.
सासवड शहरातील हे तीन टॉवर सील करण्यात आले आहेत. इंडस कंपनीच्या दोन टॉवरची एकूण 2 लाख 72 हजार 495 रुपये व रिलायन्सच्या एका टॉवरचे 2 लाख 28 हजार 341 रूपये इतकी थकीत रक्कम आहे. या कंपन्यांची थकीत रक्कम वसूल करावयाची असल्याने संबंधितांना पाच दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
पाच दिवसांत संबंधितांनी रक्कम अदा केली नाही तर त्यांच्या थकबाकीच्या किमतीच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्यात येईल. शहरातील थकबाकीदारांची नावे शहरातील विविध चौकांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी दिली.
नगरपालिकेच्या जप्ती पथकांमध्ये नगर परिषदेचे कर्मचारी संदेश मांगडे, रामानंद कळस्कर, मोहन चव्हाण, उत्तम सुतार, संजय पवार यांचा समावेश आहे. जप्तीची कारवाई टाळण्यासाठी थकीत कर भरून नागरिकांनी नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.