प्रभात नारी सन्मान पुरस्कारासाठी 5 जणींची निवड : दिमाखदार सोहळ्यात होणार गौरव
पुणे -“जागतिक महिला दिना’ निमित्ताने दैनिक “प्रभात’तर्फे “प्रभात नारी सन्मान 2020′ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 11 मार्च रोजी बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी 5 वाजता हा भव्य पुरस्कार सोहळा अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रंगणार आहे.
दैनिक “प्रभात’ आयोजित, “आर. एम. धारिवाल’ प्रस्तुत या कार्यक्रमाला “न्याती ग्रुप’, “बॅंक ऑफ महाराष्ट्र’, “महेश नागरी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.’, “सिंहगड इन्स्टिट्यूट’, ‘षर्ळीीूर.लो’, “श्रीकृष्णा पर्ल्स’ यांचे प्रायोजकत्त्व लाभले आहे.
दैनिक “प्रभात’ ने ज्याप्रमाणे सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे, त्याचप्रमाणे समाजात आपल्या उल्लेखनीय कार्याने माणुसकीचा ठसा उमटवणाऱ्या पाच महिलांना या निमित्ताने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या “सुपर वुमन’चा सत्कारही या निमित्ताने केला जाणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून “डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ’, पिंपरी, पुणेच्या उपाध्यक्षा सौ. भाग्यश्री पाटील, “मुकुल माधव फाउंडेशन’च्या मॅनेजिंग ट्रस्टी आणि “फिनोलेक्स इंडस्ट्रिज’च्या संचालिका सौ. रितू छाब्रिया, “आर. एम. धारिवाल फाउंडेशन’च्या उपाध्यक्षा श्रीमती शोभाताई धारिवाल, अध्यक्षा जान्हवी धारिवाल, “न्याती ग्रुप’च्या संचालिका सौ. सुलेखा न्याती, सौ. मैनाताई राठी, मृदुलताई जोगळेकर, सौ. सोमाणी, सौ. अनुराधा शेडगे, “दै. प्रभात’ च्या संचालिका सौ. वृषाली गांधी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कार विजेत्या महिला
देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या सावली बनलेल्या अनुराधाताई प्रभूदेसाई “नवचैतन्य हास्ययोग’ परिवाराच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवन जगण्याचे गमक शिकवणाऱ्या सुमनताई काटे, “वनवासी कल्याण आश्रमा’च्या माध्यमातून कातकरी, आदिवासी महिलांच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या ठमाताई पवार, “आत्ममग्न’ मुलांना प्रशिक्षित करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सुनीताताई लेले आणि “अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या मार्फत जटामुक्ती आणि बुवाबाजी विरोधात कार्य करणाऱ्या नंदिनीताई जाधव या पाच महिलांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे स्थळ आणि वेळ
बालगंधर्व रंगमंदिर येथे दि. 11 मार्च 2020 रोजी सायं. 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. पुरस्काराच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त “रुमानी एन्टरटेमेंट प्रस्तुत’ “90च.ङ.’ हा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.