पुणे- ड्रेनेज ओव्हरफ्लो झाल्याने ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या एका भागात अक्षरश: दुर्गंधीचे साम्राज्य पसरले. त्याच घाणीवरून सगळा ससूनचा स्टाफ चालत आणि वाहनांनी जात असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. काही तासांनंतर ते दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले.
ससून रुग्णालयात प्रवेश केल्यानंतर अधिष्ठातांच्या कार्यालयाकडे जाताना डाव्या बाजूलाच असलेल्या मॅनहोलमधून ड्रेनेज ओव्हरफ्लो होऊन सगळी घाण आणि दुर्गंधीयुक्त पाणी वाहात अक्षरश: त्या सगळ्या भागात पसरले होते. सकाळी कामावर येणारा स्टाफ, डॉक्टर्स यांना त्या ठिकाणी असलेल्या वाहनतळावर वाहन लावून चालत मुख्य इमारतीत यावे लागते.
हे सगळे अक्षरश: नाक मुठीत धरून त्या दुर्गंधीयुक्त पाण्यातून चालत जात होते. त्यामुळे घाणीचे पाय इमारतीमध्येही गेले आणि दाखल असलेल्या रुग्णांच्या आरोग्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले. काही तासांनी सफाई कर्मचाऱ्यांनी ड्रेनेज साफ केले.