पुणे- लॉकडाऊन काळात पुणेकरांनी नीरव शांततेचा अनुभव घेतला. मात्र, आता अनलॉकमुळे बरेचसे उद्योग-व्यवसाय सुरू झाले आहेत. वाहनांची वर्दळही वाढली आहे. त्यातच पावसामुळे अनेकदा वाहतूक मंदावते. अशावेळी वाहनांचे हॉर्न सातत्याने वाजवले जात असल्याने ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवले आहे.
ध्वनिप्रदूषणाचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम गंभीर असतात. “नीरि’ अर्थात “नॅशनल एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग रीसर्च इन्स्टिट्यूट’ या संस्थेने 2017 मध्ये केलेल्या व्यापक अभ्यासातून वाहनांमुळे होणारा आवाज हा पुण्यातील ध्वनिप्रदूषणाचा मुख्य स्रोत असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर पुण्यातील “परिसर’ या संस्थेकडूनही ध्वनिप्रदूषणाबाबत सातत्याने आवाज उठवला जातो. मात्र, असे असतानाही ध्वनी प्रदूषणाच्या समस्येकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळ याबाबतीत कोणत्याही ठोस उपाययोजना होत नाहीत.
लॉकडाऊन काळातील निर्बंधांमुळे बरेचसे उद्योग-व्यवसाय पूर्णपणे ठप्प होते. वाहनांचे प्रमाणही मर्यादित होते. मात्र, अलीकडेच हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
प्रशासकीय यंत्रणा ठरतेय कुचकामी
शहरात ध्वनिप्रदूषण ही एक महत्त्वाची समस्या असली, तरी प्रदूषणाबाबत नियमितपणे नोंदी घेणारी यंत्रणा उपलब्ध नाही. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे गणेशोत्सव आणि दिवाळीच्या वेळी ध्वनी प्रदूषणाची नोंद घेतली जाते. मात्र, इतरवेळी शहराच्या कोणत्या भागात कोणत्या वेळी ध्वनीचे प्रमाण किती आहे? त्याचे कारण काय? याबाबत क्वचितच अभ्यास होताना दिसतो. महापालिकेचा पर्यावरण विभाग अथवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ या दोन्हींकडे ध्वनिप्रदूषणाच्या नोंदी घेतल्या जात नसल्याचे या संस्थांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरात वाहनांचे प्रमाण वाढल्याने ध्वनीच्या प्रदूषणात नक्कीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी खासगी वाहनांचा कमीत कमी वापर आणि सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर कसा होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
– सुजित पटवर्धन,परिसर संस्था
- ध्वनिप्रदूषणाचे आरोग्यावर दुष्परिणाम
- चिडचिडेपणा, चिंता आणि तणाव
- तात्पुरता अथवा कायमस्वरूपी बहिरेपणा
- भावनिक किंवा शारीरिक परिणाम
- एकाग्रतेचा अभाव
- मानसिक थकवा अत्याधिक
- आवाजामुळे रक्त जाड होण्याची शक्यता