पुणे – ससून रुग्णालयातून पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलचा भाऊ भूषण याला मंगळवारी पुणे पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशातील बाराबंकी भरतपूर परिसरातून अटक केली. भूषण पाटीलला ताब्यात घेऊन पोलिसांचे पथक पुण्याकडे रवाना झाले आहे. यामुळे ललित पाटीलही लवकरच हाती येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भूषणच्या अटकेने अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती येणार आहेत. दरम्यान भूषणसोबत ललित पाटीलला ससून रुग्णालयात एमडी हा अमली पदार्थ देणाऱ्या जर्मन नावाच्या सप्लायरलाही अटक करण्यात आली आहे.
ससून रुग्णालयातून अमली पदार्थ विक्री करणारा तस्कर ललित पाटील याचा साथीदार सुभाष मंडल (29, रा, देहूरोड, मूळ रा. झारखंड) आणि ससून रुग्णालयाच्या उपाहारगृहातील कामगार रौफ रहीम शेख (19, रा. ताडिवाला रस्ता) यांना अटक करण्यात आली आहे. पाटीलकडून रुग्णालयातून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन घेण्यासाठी आलेल्या मंडल आणि शेख यांना गुन्हे शाखेने मागील शनिवारी (30 सप्टेंबर) अटक केली होती. त्यानंतर रुग्णालयात उपचार घेणारा ललित पाटील बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला.
दरम्यान, मुंबई पोलिसांच्या पथकाने नाशिक परिसरात छापे टाकून 130 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते. याप्रकरणी मुख्य आरोपी ललित पाटील (34), भूषण सुभाष पाटील (रा. नाशिक) आणि जर्मन ऊर्फ अभिषेक विलास बलकवडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आला. यानंतर मुंबई आणि पुणे पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर होते. ललित पाटीलचा भाऊ भूषण उत्तर प्रदेशातील वाराणसीत असल्याची माहिती तांत्रिक तपासात पोलिसांना मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांचे विशेष पथक वाराणसीला रवाना झाले.
तेथील एका लॉजमधून भूषणला आणि जर्मनला ताब्यात घेण्यात आले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांचे पथक पुण्याकडे रवाना झाले आहे. दोन वर्षांपूर्वी ललितला चाकण परिसरात पकडण्यात आले होते. त्याच्याकडून 20 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. या गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याला येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. जून 2023 मध्ये तो आजारपणाचा बहाणा करून कारागृहातून ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला.
मंत्री दादा भुसे यांच्यावर अंधारे यांचा आरोप
ललित पाटील प्रकरणात शिंदे गटाचे बंदरे व खणीकर्ममंत्री दादा भुसे यांचे नाव समोर आले आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “भुसे यांनी फोन करुन ललित पाटीलला ससूनमध्ये ठेवण्यास सांगितले. त्यामुळे त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासावेत. काल नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली, तसेच कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील सकाळी सांगितले, की या प्रकरणात शिंदे गटाच्या आमदाराचा हात आहे.
म्हणजेच याची माहिती सर्वांना आहे, पण नाव कोणी घेतले नव्हते. पण मी थेट नाव घेताना सांगते की, या प्रकरणात दादा भुसे यांच्या नावाभोवती संशयाचे धुके असेल तर त्यांचे कॉल रेकॉर्ड का चेक केले जाऊ नयेत? त्यांना प्रश्न का विचारले जाऊ नयेत? जर गृहखात्याची खरेच इच्छाशक्ती असेल, की या प्रकरणाचा छडा लावायची तर त्यांनी हा विषय स्पष्ट करायला हवा.’