पुणे – पुणे पोलीस वाहतूक शाखेतर्फे नागरिकांना गणेश उत्सव कालावधीमध्ये प्रवास सहज सुलभ होण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागामधील प्रतिष्ठीत गणपती मंडळांचे अंतर व वाहनांचे पार्किंगची सुविधा एका क्लिकवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
या “सारथी गणेश उत्सव गाईड 2023′ (Sarathi Ganesh Utsav Guide 2023) लिंकचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार अमर साबळे, आमदार माधुरी मिसाळ, सिध्दार्थ शिरोळे, सह आयुक्त संदिप कर्णिक, उप आयुक्त विजयकुमार मगर आदी उपस्थित होते.
पुण्यातील गणेश उत्सव अनुभवायचा असेल तर पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात यावे लागते. शहराच्या मध्यवर्ती भागातील मुख्य गणेश मंडळे या ठिकाणी गर्दी होत असते. तेथे दर्शनाकरीता येणा-या भाविकांच्या वाहनांचे पार्किंग करीता जवळची वाहनतळे यांची खात्रीशीर माहिती तसेच उत्सव काळातील बंद रस्ते, पर्यायी चालू रस्ते यांची माहिती असलेले हे गाईड बाप्पाचे दर्शन घेण्यासठी उपयुक्त ठरेल. पुण्याला लाभलेल्या या ऐतिहासिक आणि परंपरागत उत्सवात अधिकाधिक नागरिकांना व पर्यटकांना सहभागी होता यावे या उद्देशाने ‘सारथी’ गणेश उत्सव गाईड ची निर्मिती केली आहे.
सारथी गणेश उत्सव गाईड 2023 चा क्यू आर कोड –
‘सारथी’ गणेश उत्सव गाईडची वैशिष्ट्ये –
– या गाईडचे माध्यमातून शहराचे मध्यवर्ती भागातील मुख्य गणेश मंडळे, वाहनतळ, यांचा मार्ग पाहता येणार आहे.
– उत्सव काळातील बंद रस्ते व त्यांचे पर्यायी मार्ग यांचे मार्गदर्शन लाभेल.
– गणेश उत्सव काळातील शहरातील रिंगरोडची माहिती या मॅपवर असेल.
– उत्सव काळात शहरातील मध्यवर्ती भागातील अवजड वाहतूकीसाठी बंदी असलेले मार्ग यांची माहिती मिळू शकेल.
– उत्सव काळात गणेश मुर्ती विसर्जन घाटांची माहिती लोकेशनसह मिळणार.
दरम्यान, जास्तीत जास्त नागरिकांना पुण्यातील गणेश उत्सव अनुभवणे सोईस्कर व्हावे याकरिता सारथी’ गणेश उत्सव गाईड लिंक व क्यू आर कोडची प्रसिध्दी सोशल मिडीया, वृत्तपत्र, सर्व वाहनतळ, बसस्थानके, रेल्वे स्थानके, खाजगी ट्रॅव्हल्स थांबे, महत्वाचे चौक, गणेश मंडळे, शहरातील सर्व उपलब्ध एल.ई.डी. स्क्रिनवर या ठिकाणी बॅनर स्वरुपात लिंकची माहिती उपलब्ध केली जाईल.