नगर – वातावरणातील बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ढगाळ वातावरण, पाऊस व उन्हासह रात्रीच्या थंडगार हवेमुळे सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप अशा अनेक आजारांमुळे शहरी भागात आजच्या घडीला घरोघरी रुग्ण संख्या वाढीस लागली आहे. त्यामुळे काळजी नागरिकांनी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले असून औषधोपचार घेण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिली आहे.
गत काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. अधून मधून पाऊसही होत आहे. त्यासोबतच वातावरणात गारठा सुद्धा आहे. या पावसाळी वातावरणासोबतच अधूनमधून कडक उन्हामुळे गरमी होत आहे. हवामानातील या सततच्या बदलामुळे लहान मुलांसह मोठ्यांचे आरोग्य बिघडू लागले आहे. पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात आर्द्रता खूप वाढते.
त्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शन झपाट्याने पसरत आहे. हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पटकन पसरत असल्याने घरोघरी व्हायरलचे रुग्ण असल्याचे दिसून येत आहे. लोक सहसा सामान्य ताप आणि व्हायरल ताप यांच्यात गोंधळून जातात. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
व्हायरल तापाची लक्षणे
व्हायरल तापा दरम्यान शरीराचे तापमान वाढते. जे गंभीर संसर्ग दर्शवते., रुग्णांना अनेकदा संपूर्ण शरीरात वेदना होतात. बहुतेकदा स्नायूंमध्ये वेदना जाणवतात., तापामध्ये थंडी देखील वाजते. त्यामुळे रुग्णांना खोकला आणि नाक वाहणे अशा तक्रारी होऊ शकतात., रुग्णांना अनेकदा तीव्र डोकेदुखी होते.,रुग्णाला खूप सुस्ती येऊ शकते. त्याचबरोबर काही लोकांना त्वचेवर पुरळ येण्याची समस्या असू शकते.