दुबई :- आशिया करंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यावर मायदेशात होत असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवत आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वलस्थान मिळवण्याची नामी संधी भारतीय संघाला आहे.
या क्रमवारीत पाकिस्तान अव्वलस्थानावर होता.
मात्र, आशिया करंडक स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्टात आल्यावर त्यांची घसरण झाली व ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वलस्थानी आला. मात्र, त्यांनाही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला व त्यांचेही पहिले स्थान निसटले.
आता भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर असून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत यजमान भारतीय संघाने 2-1 असा जरी विजय प्राप्त केला तर संघ पहिल्या क्रमांकावर येईल. सध्या पाकिस्तानचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचा लाभ पाकिस्तानला झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.
एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची मालिका जिंकावी लागेल. भारतीय संघाने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली तर भारत क्रमवारीत अव्वलस्थानी येईल.