मुंबई – राज्यभरात गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीनिमित्त आनंदाचे वातावरण आहे. मोठ्या उत्साहात ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत बाप्पाला निरोप दिला जात आहे. मात्र गणपती विसर्जना दरम्यान मुंबईसह पुण्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांची एकच धांदल उडाल्याचे पाहायला मिळाले. मात्र मुंबईमधील जुहू समुद्रकिनाऱ्यावर गणपती विसर्जनासाठी तैनात असलेल्या एका तरुणावर वीज पडल्याची दुर्घटना घडली आहे.
या घटनेनंतर तरुणाला मुंबई महापालिकेच्या विलेपार्ले पश्चिम येथील कूपर रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट पाहायला मिळाला. यात जुहू समुद्रकिनाऱ्यावर गणपती विसर्जनासाठी तैनात असलेल्या एका तरुणावर वीज पडल्याची घटना समोर आली.
मुंबईत भर दुपारी अंधार
दरम्यान, मुंबईत दुपारी साडेतीनच्या सुमारास ढग दाटून येऊन तुफान पाऊस कोसळला. विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अंधेरी, गोरेगाव, दादरसह गिरगाव चौपाटी (Girgaon Chowpatty) परिसरात पावसाचा जोर पाहायला मिळाला. मुंबईत भर दुपारी अंधार पसरला. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट पाहायला मिळाला. या भर पावसातही अनेक गणेश मंडळांनी आपल्या मिरवणुका चालूच ठेवल्या.
मुंबईच्या रस्त्यांवर कार्यकर्त्यांची गर्दी आणि कोसळणारा पाऊस असं चित्र होतं. अंधेरी परिसरात पावसाचा जोर इतका होता की त्यामुळे दृष्यमानताही कमी झाली. त्याशिवाय विजांचा कडकडाटही भीतीदायक होता. तर तिकडे पुण्यातही मुंबईप्रमाणे परिस्थिती पाहायला मिळाली. दिवसा सुद्धा अंधार पाहायला मिळाला आहे.