पुणे – महापालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना 2020-2021 ते 2024-25 या पाच आर्थिक वर्षांसाठी सानुग्रह अनुदान आणि जादा रक्कम मिळण्याबाबत पुणे मनपा कामगार युनियनशी करार झाला आहे. त्यानुसार, या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीच्या मंगळवारी बैठकीत मान्यता दिल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले की, “सानुग्रह अनुदानापोटी पुढील पाच वर्षे देण्यात येणारी रक्कम निश्चित करण्यात आली आहे. ती अनुक्रमे 17 हजार, 19 हजार, 21 हजार, 23 हजार आणि 25 हजार इतकी असणार आहे. विशेष म्हणजे, करोना काळामध्ये बालवाडी सेविकांनी दिलेल्या योगदानाची नोंद घेऊन त्या सेवकांना, सर्व शिक्षा अभियानामध्ये काम करणाऱ्या एकूण 66 कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित मनपा सेवकांप्रमाणे सानुग्रह अनुदान पूर्ण देण्यात येणार आहे.
विशेष बाब म्हणून शिक्षण विभाग (प्राथमिक) कडील एकूण 96 शिपाई (रोजंदारी) सेवकांना यंदाच्या वर्षी करोना काळातील कामकाजामुळे 174 दिवस भरत असल्याने त्यांना वरीलप्रमाणे सानुग्रह अनुदानाचे फायदे अदा करण्यात येणार आहेत. करोना काळात मनपा सेवकांनी उत्तम काम केल्याबद्दल बोनस आणि सानुग्रह अनुदानाव्यतिरिक्त बक्षीस म्हणून यावर्षी तीन हजार रुपयांचे विशेष अनुदानही देण्यात येणार असल्याचे रासने यांनी स्पष्ट केले.