नवी दिल्ली : तामिळनाडूमध्ये नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. दरम्यान, या निवडणुकामंध्ये एक उमेदवार सध्या ट्रोल होताना दिसत आहे. भाजपाचे पदाधिकारी डी. कार्तिक यांना केवळ एकच मत मिळवता आले. विशेष म्हणजे कार्तिक यांच्या घरामध्ये पाच सदस्य असूनही त्यांना केवळ एकच मत मिळाल्याने त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.
डी. कार्तिक यांना एकच मत मिळाल्याची बातमी सोशल नेटवर्किंगवर वाऱ्यासारखी पसरल्यानंतर त्यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. तामिळनाडूमधील कोईम्बतूर जिल्ह्यामधील पेरियानाइकनपालयममध्ये वॉर्ड सदस्य पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये डी कार्तिक यांना एकच मत मिळाल्याच्या बातमीवर लेखिका आणि कार्यकर्ता मीना कंदासामी यांनी ट्विट केले आहे.
“स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपाच्या एका उमेदवाराला केवळ एकच मत मिळालं आहे. मला यांच्या घरातील चार सदस्यांवर गर्व आहे. ज्यांनी इतरांना मत देण्याचा निर्णय घेतला,” असा टोला मीना यांनी लगावला आहे.
काँग्रेसचे नेते अशोक कुमार यांनी, “वॉर्ड सदस्य पदाची निवडणूक लढणाऱ्या भाजपा उमेदवाराच्या घरी एकूण पाच सदस्य आहेत. मात्र भाजपा उमेदवाराला कोईम्बतूरमध्ये एकच मत मिळालं आहे,” असे म्हटले आहे. एका युझरने दिलेल्या माहितीनुसार डी. कार्तिक यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी जारी केलेल्या पोस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि स्वत:च्या फोटोसहीत सात नेत्यांचे फोटो होते. मात्र त्याला एकच मत मिळाले.
याचसंदर्भात एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना भाजपा युथ विंगचे जिल्हा उपाध्यक्ष असणाऱ्या कार्तिक यांनी आपण भाजपाच्या वतीने ही निवडणूक लढलो नव्हतो असं म्हटलं आहे. मी गाडी हे निवडणूक चिन्ह घेऊन अपक्ष म्हणून लढलो होते. माझ्या कुटुंबात चार मत आहेत. मात्र सर्व मत पंचायतीच्या वॉर्ड चारमध्ये आहेत. मी पंचायतीच्या वॉर्ड क्रमांक ९ मधून निवडणूक लढलो होतो. तिथे माझ्या कुटुंबातील एकही व्यक्ती मतदान करत नाही. दरम्यान सोशल नेटवर्किंगवर माझी खिल्ली उडवण्यासाठी मी भाजपाकडून लढलो आणि माझ्या कुटुंबियांनीही मला मतं दिली नाहीत असे सांगितले जात आहे. हे दावे चुकीचे आहेत, असे कार्तिक म्हणाले आहेत.
राज्यामध्ये स्थानिक पंचायत वॉर्ड निवडणुका ६ आणि ९ ऑक्टोबर रोजी दोन चरणांमध्ये पार पडल्या. यामध्ये एकूण २७ हजार तीन पदांसाठी ७९ हजार ४३३ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते.