प्रत्येक वर्षी नाताळाच्या दिवशी परी मम्माने सजवलेल्या ख्रिसमस ट्री जवळ जाते आणि सांताने ठेवलेल्या गिफ्ट पाहून खूश होते. परी… बबु तुझी लिस्ट आली बरं का… दर वर्षीचा डायलॉग परी आणि तिच्या मम्माचा. नाताळाच्या दिवशी सांताक्लॉज खेळणी वाटतो नव्हे हव्या असलेल्या वस्तू मोज्यामध्ये ठेवून जातो म्हणून भला मोठा लाल रंगाचा चमकदार सुंदर मोजा अडकवून ठेवणे, ख्रिसमस ट्री सजवणे सुशोभित करून त्याला लायटिंग करणे, केक करणे, फटाके वाजवणे वगैरे नानाउपक्रम नाताळाच्या दिवशी हल्ली जवळजवळ घरोघरी चालतात. छोटी मुले सांताच्या गिफ्टसाठी आणि आई-बाबा मुलांच्या खुशीसाठी खूश. प्रत्येक घरात सांता रात्री मुलांच्या उशीखाली किंवा मोज्यामध्ये गिफ्ट ठेवून जातो. सकाळी उठली की मुले गिफ्ट पाहून खूश…
परी अगदी लहान असल्यापासून सांताकडून गिफ्ट मिळवत आलेली आहे. तिने इच्छा केलेल्या वस्तू तिला नेहमीच सांता देत असे… सुरुवातीला एकदाच तिला नकळत सरप्राईज गिफ्ट मिळाल्या पण त्यातल्या काही तिला आवडल्या तर काही नाही. त्यामुळे त्या नंतर पुढच्या वर्षीपासून ती आवडीच्या वस्तूंची लिस्ट करून ख्रिसमस ट्री जवळ ठेवून देई आणि त्या तिला मिळत. नाताळाच्या आधी सुरुवातीला 4/5 दिवस आधी घर सजू लागे. फुगे, झुरमुळ्या, चांदणीचा आकाशदिवा आणि छोट्या खेळण्यांनी बेल (घंटा), चमकदार वस्तू नि लायटिंगनी हिरवागार ख्रिसमस ट्री सजे… परी खूश! त्यामुळे सगळे घर खूश! अजूनही ही प्रथा सुरूच आहे. पहिलीतली 5 वर्षांची परी तिची पहिली मागणी वेगवेगळ्या बाहुल्या, बार्बी, रडणारी बाहुली, गाणारी, चोखणी घेणारी, नाचणारी, बोलणारी वगैरे असत. मागण्या आणि लिस्ट बदलत जाऊन आता यंदा ती दहावीला आहे आणि यंदाच्या लिस्टमध्ये लेटेस्ट स्मार्ट फोन आणि लॅपटॉप आहे आणि लाडक्या परीची एक मागणी पूर्ण झाली लेटेस्ट स्मार्ट फोनची. मात्र सांतानेही चिठ्ठी लिहून ठेवली दुसरी मागणी लॅपटॉप 10 वीचा रिझल्ट लागल्यावरच मिळणार. त्यामुळे तिचे सगळे लक्ष आता पूर्ण अभ्यासावरच केंद्रित केलंय.
सांताक्लॉज किंवा ख्रिसमसबाबा हा भेट वस्तू छोट्या मुलांना का वाटतो. यामागे एक कथा सांगितली जाते. नगरात निकुलस नावाचा एक श्रीमंत माणूस राहात असे. पैशाने तसेच मनानेही खूप श्रीमंत होता. तो गरिबांना मदत करत असे. दयाळू आणि कनवाळू होता. लहान मुलांना भेटवस्तू देऊन आनंद देत असे. मात्र हे करत असताना त्याला त्याची ओळख लपवायची होती. त्यामुळे रात्रीच्या वेळी मुलांना भेट वस्तू देई. त्यातूनच सांताक्लॉज अस्तित्वात आला आणि अजूनही त्या रुपात भेट वस्तू देतो.अर्थात आपापल्या घरी मुलांचे आईबाबाच ह्या भेट वस्तू सांताच्या नावाखाली पुरवत असतात हे सांगणे न लागे… अशाप्रकारे रात्री सांता येऊन भेटवस्तू ठेवून जातो आणि सकाळी मुलांना त्या मिळतात. आनंदी आनंद होतो.
अनुराधा पवार