पिंपरी, (प्रतिनिधी) – प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली असून आत्ताच्या आधुनिक युगात संस्कार आणि गुणवत्ता आवश्यक आहे. असे प्रतिपादन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी आकुर्डी येथील श्री म्हाळसाकांत माध्यमिक विद्यालयात केले.
रोटरी क्लब निगडीच्या वतीने विद्यालयाला २० संगणक संच भेट देण्यात आले. तसेच मलबार गोल्ड ॲण्ड डायमंड कंपनीने २० गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजारांची स्कॉलरशिप दिली. विद्यालयातील नवीन प्रयोगशाळा व संगणक लॅबचे उद्घाटन ॲड. संदीप कदम यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
त्याप्रसंगी पिंपरी चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे, मलबार गोल्ड ॲण्ड डायमंड कंपनीचे एस. अन्वर, प्राचार्य भानुदास मालुसरे, रोटरीचे राकेश सिंघानिया, प्राचार्य बेज्मी ग्रेगरी लोबो, के.डी. गायकर, एस. ए. मोरे,
अंजली फर्नांडीस, प्रीती दबडे, योगिता काळे, अशोक आवारी, ज्ञानेश्वर पंडीत, संदीप पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र पाटिल, विद्या कदम, शिल्पा कांबळे यांनी केले. तर विद्या मोर यांनी आभार मानले.