मुंबई : राज्यातील राजकारणात खळबळ उडवणारी माहिती समोर आली. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा देखील झाल्याचे समोर आले. यामुळे आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले.
यावर आता माध्यमांशी बोलतांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस वैगेरे घडणार नाही असं विधान केले आहे.
ते पुढे म्हणाले,’ शरद पवार आणि फडणवीसांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. या भेटीनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस वैगेरे घडणार नाही. उलट या भेटीत शरद पवार यांनीच विरोधक सरकारच्या कामात अडथळे आणण्यावरुन देवेंद्र फडणवीस यांचे कान टोचले असतील. ‘ असं म्हणत भाजप नेत्यांवर त्यांनी टीका केली.’
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचा फोटो ट्विट करून, माहिती दिली. “माजी केंद्रीयमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.” असे फडणवीस यांनी ट्विट केले.