मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतची माहिती स्वतः शरद पवार यांनी दिली. ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. शरद पवारांच्या निवृत्तीची घोषणा होताच अनेक कार्यकर्त्यांनी निर्णय मागे घेण्याची त्यांना विनंती केल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, शरद पवारांच्या या निर्णयावर खासदार संजय राऊत यांनी देखील ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. संजय राऊत आपल्या पहिल्या ट्विट मध्ये म्हणतात की, “एक वेळ अशी आली की घाणेरडे आरोप प्रत्यारोप झाले, त्यावेळी राजकारणाची उबग येऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवायांनी तेच केले आहे’. असं राऊत म्हणाले.
भाकरी फिरवण्याचे संकेत होते..पण तवाच फिरवला.. pic.twitter.com/kkWDG2I15s
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 2, 2023
तसेच ते पुढे म्हणाले.., “शिवाय ‘भाकरी फिरवण्याचे संकेत होते… पण तवाच फिरवला… अशा आशयाचे दुसरे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. सध्या त्यांचे हे दोन्ही ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, राज्याच्या राजकारणातील ही महत्वाची बातमी असून शरद पवार यांच्या निर्णयाने अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोध केला. तसेच सभागृहात उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार’ अशा घोषणा देण्यात आल्या होत्या.