पुणे – मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरच्या भोंग्याविरोधात शिवतीर्थावरुन एल्गार तर केला. मात्र त्याच एल्गाराचे साईड इफेक्ट पक्षात उमटू लागले आहेत.
पुण्यातल्या काही मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊ केले आहेत. तर, दुसरीकडे ‘आपण प्रभागात शांतता ठेवण्यास प्राधान्य देणार’ असल्याचे मनसेचे डॅशिंग नगरसेवक वसंत मोरे यांनी सांगितलं होत.
दरम्यान, वसंत मोरेंच्या या भूमिकेनंतर पक्षांतर्गत अनेक चर्चा रंगू लागल्या आहे. राज ठाकरेंच्या या निर्णयावर वसंत मोरे काहीसे नाराज असल्याचं दिसून येत आहे. अशावेळी पक्षातील नाराजी कमी करण्यासाठी वसंत मोरे यांना खुद्द राज ठाकरेंनीच बोलावणं पाठवलं आहे.
राज ठाकरे यांनी वसंत मोरेंना भेटीसाठी शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानी बोलावलं आहे. वसंत मोरे हे शुक्रवारी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईला जाणार आहेत.
त्यावेळी राज ठाकरे वसंत मोरे यांची नाराजी कशाप्रकारे दूर करतात आणि वसंत मोरे आपल्या मतदारसंघातील मुस्लिम मतांचं गणित साधण्यासाठी काय करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.