मुंबई – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळासह देशातील राजकारणात देखील हा विषय चर्चेचा झाला. यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करायला सुरुवात केली. तसेच, शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली. यानंतर आता राष्ट्रवादीच्या निवड समितीने शरद पवारांचा राजीनामा फेटाळला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्य्क्ष पदावरून शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पक्षाला नवा अध्यक्ष कोण असेल यावरून चर्चा सुरु असताना आता शरद पवारांनीच अध्यक्ष राहावं असा बैठकीत ठराव मंजूर करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, आता या सगळ्या घडामोळींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले? वाचा….
‘शरद पवार यांचा राजीनामा हा ठरवून केलेला आहे का?’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता संजय राऊत म्हणाले की, ‘मला काही माहिती नाही, मी लवकरच शरद पवार यांना भेटणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहे. मुळात त्यांचा हा अंतर्गत प्रश्न आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीने जर प्रस्ताव फेटाळला असेल तर माझं मत आहे ते योग्य आहे. तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय असला तरी याचा विरोधी पक्षाच्या राजकारणावर परिणाम होऊ शकतो’. असंही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ‘आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत जशा विरोधी पक्षांनी आपल्या भावना पवार साहेबांना कळविल्या तशाच उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या भावना शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचविल्या आहेत’, असंही संजय राऊत म्हणाले.