…अखेर नक्षा उतरला, मांजरेकरांचा माफीनामा

समालोचनाची संधी देण्याची विनंती

मुंबई – घमेंडखोर वृत्तीने क्रिकेट समालोचन करताना अनेक खेळाडूंवर सातत्याने बोचरी टीका करणारे समालोचक व माजी कसोटी क्रिकेटपटू संजय मांजरेकर आता दाती तृण घरून बीसीसीआयसमोर लीन झाले आहेत. माझी चूक झाली, मला समालोचकांच्या संघात संधी द्या पुन्हा अशी चूक होणार नाही, अशा शब्दांत गेल्या चार दिवसांत दोन वेळा बीसीसीआयला ई-मेल करून आपला माफीनामा सादर केला आहे. अर्थात बीसीसीआयकडून अद्याप त्यांना कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.

आयपीएल स्पर्धा सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत होणार हे निश्‍चित झाल्यावर आपला समावेश समालोचकांच्या पथकात करावा, अशी विनंती मांजरेकर यांनी केली होती. त्यानंतर आणखी एक विनंती केली असून यापुढे बीसीसीआयच्या नियमांचे पालन करून समालोचन करेन तसेच कोणावरही अवाजवी टीका करणार नाही. मला एक संधी द्या, अशी मागणी मांजरेकर यांनी केली आहे. बीसीसीआयने मांजरेकर यांना मार्च महिन्यात समालोचकांच्या पथकातून बाहेर काढले होते.

एक संधी मिळणार

संजय मांजरेकर हे उत्तम क्रिकेटपटू होते, त्यांचे खेळाचे ज्ञानही चांगले आहे. त्यांना जर नियमांचे पालन करून काम करायचे असेल तर त्यांना एक संधी दिली जाऊ शकते, अर्थात, त्यांच्या नियुक्‍तीबाबत अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शहा हेच निर्णय घेतील, असे बीसीसीआयच्या एका सदस्याने सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.