एकतर्फी प्रेमातून शेजाऱ्याने केला विवाहितेचा खून

  • अजंठानगरमधील धक्‍कादायक घटना

पिंपरी – एकतर्फी प्रेमातून तरुणाने एका विवाहितेचा चाकूने वार करून खून केला. त्यानंतर स्वतःवरही वार करून घेतले. चिंचवड, अजंठानगर येथे शनिवारी (दि. 1) दुपारी दोनच्या सुमारास ही धक्‍कादायक घटना घडली.

राणी सतीश लांडगे (वय 29) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. अरविंद शेषराव गाडे (वय 30, दोघेही रा. अजंठानगर, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला राणी आणि आरोपी अरविंद हे शेजारी राहत होते. दरम्यान, त्यांच्यात ओळख झाली. अरविंद हा राणी यांच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. याबाबत राणी यांचे पती सतीश यांनी त्याला समजावून सांगितले होते.

अरविंद वारंवार फोन करीत असल्याने राणी यांनी मोबाईल क्रमांक बदलला होता. त्यामुळे चिडलेल्या अरविंद याने शनिवारी राणी यांच्यावर चाकूने सपासप वार करीत हल्ला केला. राणी रक्‍ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर अरविंद याने स्वतःवरही वार करून घेतले आहेत. त्याच्यावर पिंपरीतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.