Sanjay Gaikwad। शिंदे गटाची लोकसभेची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर महायुतीत चांगलीच धुसफूस सुरु झालीय. अमरावतीनंतर आता बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटासमोर तिढा निर्माण झालाय. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पहिल्या यादीत विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचे नाव आहे. मात्र, त्यांचं नाव जाहीर होण्यापूर्वीच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी तडकाफडकी जाऊन लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार संजय गायकवाड आपला अर्ज मागे घेतील, असं खासदार प्रतापराव जाधव म्हणाले. मात्र आपण आपल्या उमेदवारीवर ठाम असल्याचे गायकवाड यांनी म्हटले. त्यामुळे या जागेवर पेच निर्माण झालाय.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत संजय गायकवाड यांनी आपल्या उमेदवारीविषयी माहिती दिली. याविषयी बोलताना त्यांनी आपण अर्ज मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केलंय. “मी बंड केलेलं नाही, मात्र मी माझ्या उमेदवारीवर ठाम आहे. 4 तारखेनंतर कळेल काय होतं,” असेही त्यांनी म्हटले आहे. मला निवडणूक लढवावी वाटली म्हणून मी नामांकन दाखल केलं, असे ते म्हणाले. दरम्यान, पक्षाकडून लोकसभेची यादी जाहीर होण्यापूर्वीच संजय गायकवाडांनी जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
अर्ज मी अचानकपणे केलेला नाही Sanjay Gaikwad।
आमदार संजय गायकवाड यांनी, “मी निवडणूक लढवण्याच्या उद्देशानं अर्ज दाखल केला आहे. लोकसभेसाठीचा उमेदवारी अर्ज मी अचानकपणे दाखल केलेला नाही. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीचा पहिला दिवस होता. मी आधीपासूनच ठरवलेलं लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं. फक्त दरवेळी मी पाच-पन्नास हजार लोकं सोबत घेऊन जातो आणि उमेदवारी अर्ज दाखल करतो. यावेळी फक्त पाचचजणांसोबत जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.”असे त्यांनी सांगितले.
मी निवडणूक लढवण्यावर ठाम Sanjay Gaikwad।
प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, “माझा उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत अद्याप काहीच ठरलेलं नाही. प्रतापराव जाधव आणि माझी जी भेट झाली, त्यामध्ये याबाबत काहीच चर्चा झालेली नाही. अजूनतरी माझा अर्ज कायम आहे. मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. येणाऱ्या काळात दिसेलच सर्वांना. तुम्हीही आहात आणि आम्हीही आहोत.”असे ते म्हणाले.