बारामती (प्रतिनिधी): कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारामती परिवहन महामंडळाकडून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझेशन बस सेवा सुरु करण्यात आली आहे. कोरोना हद्दपार करण्यासाठी कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून सॅनिटायझेशन बस तयार केली असल्याचे पुणे विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी सांगितले.
बारामती शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सॅनिटायझेशन व्हॅन तयार केली आहे. शहरातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टर व त्यांचा स्टाफ,पोलीस प्रशासन,नगर पालिकप्रशासन,प्रांतकार्यालय,तहसील कार्यालय व सरकारी कर्मचारी यांना त्याची सेवा बजावताना किंवा घरी जाताना कोरोनचा संसर्ग होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे .बस मध्ये ४०० लिटर पाण्यामध्ये सोडिअम हायड्रो क्लोराईड हे निर्जंतुकीकरण करणारे औषध वापरले जाणार आहे.डी.सी करंटवर बारा व्होल्टची मोटार आहे. प्रांताधिकारी दादासो कांबळे त्यांच्याकडे बस सोपवण्यात आली आहे.
या सॅनिटायझर गाडीवर एसटी महामंडळाचे कामगार चालक असणार आहेत. बसमध्ये असणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर सॅनिटायझेशन तुषार उडणार असून त्या व्यक्तीचे पूर्णपणे निर्जंतुक करण होणार आहे.यावेळी पुणे विभाग नियंत्रक यामिनी जोशी,यंत्र अभियंता अशोक सोट पुणे,विभागीय वाहतूक अधिकारी दीपक घोडे,आगर प्रमुख अमोल गोंजारी,वाहतूक यंत्र अभियंता पांडुरंग वाघमोडे यावेळी उपस्थित होते.