- लग्नपत्रिकांपासून बनविली पाकिटे
पिंपरी – करोना संसर्गामुळे संचारबंदी असल्याने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडता येत नाही. अशा परिस्थितीत सतत घरात राहून करायचे तरी काय? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मात्र, या काळात आपला एखादा छंद जपल्यास, ज्ञानात भर घालणाऱ्या चांगल्या पुस्तकांचे वाचन केल्यास आपले मन घरातही आपोआप रमू शकते. रहाटणी येथील सुषमा नहार यांनी घरातील कामातून वेळ काढून असाच आपला एक आगळा-वेगळा छंद जपला आहे. त्यांनी जुन्या लग्नपत्रिकांपासून आकर्षक पाकिटे तयार केली आहेत.
सध्या संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे घराबाहेर पडता येत नाही. सारखे घरातच बसून काय करायचे? असा प्रश्न प्रत्येकाला भेडसावतो आहे. त्यातून नैराश्य येत आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या छंदासाठी वेळ दिल्यास हा वेळ सत्कारणी लागू शकतो. हीच बाब लक्षात घेऊन नहार यांनी आपल्या छंदासाठी घरातील कामातून वेळ काढला. त्या म्हणाल्या, लॉकडाऊन झाल्यानंतर घराबाहेर पडणे बंद झाले. मैत्रिणींसोबतची किटी पार्टी बंद झाली. नातेवाईकांकडे जाणे-येणे थांबले. अशा परिस्थितीत मन कसे रमणार? असा प्रश्न पडला. मग माझ्या जुन्या छंदाने डोके वर काढले.
कपाटातून सर्व जुन्या लग्नपत्रिका, कार्डशीट बाहेर काढले. त्यातील उपयोगी भाग कापून घेतला आणि मनाप्रमाणे प्रेझेंट पाकिटे बनविण्यास सुरवात केली. पाहता-पाहता 40 ते 50 पाकिटे पण तयार झाली. विशेष म्हणजे एकही पाकीट दुसऱ्या पाकिटासारखे नाही. माझ्या खोलीमध्ये त्याचे प्रदर्शन मीच मांडले. खर्च म्हणाल तर फक्त 1 फेव्हिकॉलची ट्यूब (बाटली). बाकी सर्व पत्रिकांतून कट केलेले पॅचेस वापरले आणि लावले.
करोनाच्या संकटामुळे सध्या निर्माण झालेल्या नैराश्याच्या वातावरणात माझ्या छंदामुळे मला नवीन सकारात्मक ऊर्जा मिळाली. माझ्यात दडून बसलेल्या कलाकाराने मला खुणावले. जगण्याची नवी ऊर्मी मिळाली. टाकावू वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याची, जुन्यातून नवनिर्मिती करण्याची माझी आंतरिक इच्छा पूर्ण झाली.
– सुषमा नहार, गृहिणी.