पुणे – आधी करोनामुळे दोन वर्षे आणि मागील वर्षी निविदा प्रक्रियेत खोटी कागदपत्रे सादर केल्याच्या वादातून महापालिकेने गेली तीन वर्षे महापालिका शाळेतील मुलींना सॅनिटरी नॅपकीन देण्यात आलेले नाहीत. त्यातच; यंदाही प्रशासाने काढलेली निविदा वादात सापडण्याची चिन्हे आहेत.
नॅपकीन पुरविण्यासाठी सात निविदा आल्या होत्या. मात्र, त्यातील पाच निविदाधारकांना अपात्र करण्यात आले असून उर्वरित दोन निविदाधारकांची निविदा 1 टक्के पेक्षाही कमी दराने आल्याने या निविदेत रिंग झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच या निविदेमुळे महापालिकेचे 24 लाखांचे नुकसान होण्याची भितीही व्यक्त करण्यात आली असून ही निविदा रद्द करावी, अशी मागणीही महापालिका आयुक्तांकडे या पत्रात करण्यात आली असून फेरनिविदा काढण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, सलग दुसऱ्या वर्षी निविदांमुळे झालेल्या वादाने शालेय मुलींची फरफट होत असून महापालिका नॅपकीन देणार का नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून याबाबतची सद्यस्थिती महापालिका आयुक्तांसमोर ठेवण्यात आली असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
“निविदा प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप नाही. नियमानुसार निविदा काढण्यात आलेली आहे. तर कागदपत्र नसलेल्या ठेकेदारांनाही संधी देण्यात आली होती.” – चेतना केरूरे, उपायुक्त, मध्यवर्ती भांडार विभाग