शिराळा (प्रतिनिधी) – सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मोरणा, टाकवे, करमजाई आणि मानकरवाडी ही धरणे भरली आहेत. तसेच, सर्वात मोठे चांदोली धरणाचा पाणीसाठा ही 70 टक्क्यांवर आला आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने धरणांतून तसेच चांदोली येथील वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग बंद करण्यात आला आहे. मोरणा, टाकवे, करम जाई ही धरणे पूर्ण भरली असून सांडव्यातून पाणी वाहत आहे.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने चांगली हजेरी लावली होती. त्यामुळे प्रमुख धरणे भरली आहेत. टाकवे 104.95 द.ल.घ. फु., करमजाई 59.22 द ल घ फु, मानकरवाडी 99.60 द.ल.घ फु, तसेच मोरणा धरण 747.94 द. ल. घ. फु, अशी चार धरणे भरली आहेत.
गिरजवडे मध्यम प्रकल्प नवीन व मातीचा आहे या धरणाच्या दगडी पिचिंग चे नुकसान झालेले होते. त्यामुळे दुरुस्तीसाठी या धरणातील पाणी सोडण्यात आले होते. सध्या हे काम पूर्ण झाल्याने पुन्हा पाणीसाठा करण्यात येत आहे. हा प्रकल्प सध्या 60 टक्के भरला आहे. एकूण 42 पाझर तलावांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. चांदोली परिसरात सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्याने वीजनिर्मिती केंद्रातील विसर्ग बंद करण्यात आला आहे.