पिंपरी (प्रतिनिधी) – मावळ लोकसभेचे माजी खासदार दिवंगत गजानन बाबर यांच्या जीवनावर आधारित ‘संघर्षयात्री’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांच्या हस्ते सोमवारी (दि. २६) सायंकाळी साडेपाच वाजता चिंचवड येथे होणार आहे.
चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात होणाऱ्या या समारंभासाठी खासदार श्रीनिवास पाटील, अरविंद सावंत, डॉ. अमोल कोल्हे, आमदार सचिन आहिर, माजी आमदार विलास लांडे, मदन भोसले, महादेव बाबर, माजी महापौर आझम पानसरे, संजोग वाघेरे आदी उपस्थित राहणार आहेत.
‘किकली ते दिल्ली, व्हाया पिंपरी-चिंचवड’ असा खडतर प्रवास करत जवळपास ४५ वर्षांची राजकीय कारर्कीर्द गजानन बाबर यांनी यशस्वीपणे पूर्ण केली. शिवसेनेच्या माध्यमातून बाबर यांनी पिंपरी पालिकेचे तीन वेळा नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व केले. या कालावधीत ते पालिकेतील विरोधी पक्ष नेते ही होते.
हवेली विधानसभा मतदारसंघातून ते सलग दोन वेळा आमदारपदी निवडून आले. मावळ लोकसभेची निर्मिती झाल्यानंतर मावळचे पहिले खासदार म्हणून गजानन बाबर यांची नोंद झाली. त्यांच्या जन्मापासून ते निधनापर्यंतच्या प्रवासाचा सविस्तर व सचित्र आढावा घेणारे हे पुस्तक प्रसिध्द करण्यात येत आहे.
पुणेस्थित लेखक व पत्रकार तानाजी गोरे लिखित या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार तसेच संजय राऊत यांच्या हस्ते सोमवारी (दि. २६) होणार आहे. यानिमित्ताने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, विविध संस्था, संघटना, बँकांचे प्रतिनिधी तसेच गजानन बाबर यांच्यासह संपूर्ण बाबर परिवार समारंभास उपस्थित राहणार आहेत.